‘चासकमान’मधून रब्बीचे पहिले आवर्तन | पुढारी

‘चासकमान’मधून रब्बीचे पहिले आवर्तन

कडूस : पुढारी वृत्तसेवा :  खेडसह शिरूर तालुक्याला वरदान ठरलेल्या चासकमान धरणाच्या विद्युतगृहाद्वारे डाव्या कालव्यात शुक्रवारी (दि. 15) सकाळी 9 वाजता रब्बी हंगामाचे पहिले आवर्तन 300 क्युसेकने सोडण्यात आले. खेडसह शिरूर तालुक्यातील शेतकर्‍यांच्या मागणीनुसार आवर्तन सोडण्यात आले आहे. या आवर्तनाचा रब्बी हंगामातील कांदा, बटाटा, ज्वारी, गहू, हरभरा, मका आदीसह तरकारी पिकांना फायदा होणार आहे. चासकमान धरणात सध्या 93.63 टक्के इतका पाणीसाठा शिल्लक आहे. मागील वर्षी याच तारखेला धरणात 97.90 टक्के इतका पाणीसाठा शिल्लक होता. यंदा धरणाच्या पाणलोट क्षेत्रांत 664 मिलिमिटर इतका पाऊस झाला आहे. दरवर्षीच्या तुलनेने पावसाने सरासरी गाठलीच नाही.

चासकमान धरणाच्या डाव्या कालव्याद्वारे सोडण्यात आलेले खरीप हंगामातील आवर्तन दि. 15 ऑक्टोबर रोजी बंद करण्यात आले होते. यानंतर शेतकर्‍यांनी कालव्याच्या पाण्याच्या भरवशावर रब्बी हंगामातील पिकांच्या लागवडी मोठ्या प्रमाणात केल्या. त्यामुळे कालव्याद्वारे पाणी सोडण्याची मागणी जोर धरू लागली होती. अखेर प्रशासनाने शुक्रवारी सकाळी धरणातून कालव्याद्वारे पाणी सोडण्यास सुरुवात केली. डिसेंबर महिन्यात धरणातील पाणीसाठा काहीसा घटला असून, या वर्षी पाणी टंचाई भासणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यातच कालव्याचे अस्तरीकरण काही ठिकाणी न झाल्याने चासकमान धरणाच्या कालव्याद्वारे मोठ्या प्रमाणात पाण्याची गळती होत आहे. अनेक शेतकर्‍यांच्या पिकांमध्ये पाणी साचण्याची शक्यता आहे. यामुळे प्रशासनाने कालव्याचे पाणी योग्य क्षमतेने सोडावे, अशी मागणी होत आहे.

हेही वाचा :

Back to top button