आमदारकीची समीकरणं बदलणार ? खा. कोल्हे-माजी आमदार सोनवणेंची जवळीक

आमदारकीची समीकरणं बदलणार ? खा. कोल्हे-माजी आमदार सोनवणेंची जवळीक

नारायणगाव : राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेच्या फुटीनंतर आता जुन्नर तालुक्यातील राजकारणाला कलाटणी मिळणार असे सध्या दिसतंय. जुन्नरचे माजी आमदार शरद सोनवणे यांच्यात आणि शिवसेनेचे उपनेते माजी खासदार शिवाजीराव आढळराव-पाटील यांच्यात झालेला दुरावा आणि खासदार डॉ. अमोल कोल्हे व सोनवणे यांच्यात वाढत चाललेल्या जवळकीने आगामी काळात जुन्नर तालुक्यामध्ये काही राजकीय उलथापालथ होण्याची दाट शक्यता आहे.

संबंधित बातम्या :

राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर जुन्नरचे आमदार अतुल बेनके अद्याप जरी तटस्थ असले, तरी बहुधा ते पुढील महिन्यात आपला निर्णय जाहीर करू शकतात, ते अजित पवार यांच्यासोबत जातील असे त्यांचे कार्यकर्ते खासगीत सांगतात. आ. बेनके जर महायुतीमध्ये गेले, तर मग मात्र शरद सोनवणे यांची उमेदवारी मिळण्यावरून पंचाईत होऊ शकते. विद्यमान आमदार बेनके जर महायुतीमध्ये गेले, तर उमेदवारी त्यांनाच मिळणार त्यामुळे माजी आमदार शरद सोनवणे यांना वेगळा पर्याय शोधावा लागणार आहे. त्याचीच पूर्वतयारी म्हणून शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे यांच्याशी त्यांनी जवळीक करण्यास सुरुवात केली आहे.

बेनके यांना महायुतीची उमेदवारी मिळाली, तर भाजप नेत्या आशा बुचके यांनादेखील वेगळा पर्याय निवडावा लागू शकतो. बुचके-सोनवणे यांनादेखील 2024 ची विधानसभा लढायचीच आहे, असं त्यांचे जवळचे कार्यकर्ते सांगत आहेत. दोन दिवसांपूर्वी खासदार अमोल कोल्हे यांनी शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त जुन्नरला महाआरोग्य शिबिर आयोजित केले होते. या शिबिराला शिवसेनेचे माजी आमदार शरद सोनवणे यांची उपस्थिती, त्यांनी केलेले भाषण शरद पवार व खासदार कोल्हे यांचे केलेलं कौतुक यामधून बराच काही अर्थ निघू शकतो. खासदार कोल्हे जरी कितीही म्हणत असले हा कार्यक्रम राजकीय नव्हता, तरी पण शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेला कार्यक्रम आणि तो राजकीय नाही असं कसं होऊ शकतं ?

शरद पवार यांच्या गटासोबत अमोल कोल्हे आहेत. माजी खासदार शिवाजीराव आढळराव हेसुद्धा लोकसभेची निवडणूक लढवणार आहेत. महायुतीमध्ये शिरूरची जागा अजित पवारांच्या गटाकडे जाऊ शकते. त्यामुळे माजी खासदार शिवाजीराव आढळराव यांना अजित पवारांच्या गटात जाऊन हातामध्ये घड्याळ बांधण्याची वेळ येऊ शकते. आढळराव व राष्ट्रवादीचे नेते यांचे संबंध कसे आहेत हे वेगळे सांगण्याची गरज नाही.

शिरूर लोकसभा मतदारसंघातील सर्वच राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदारांशी आढळराव यांचे संबंध आजवर चांगलेच राहिलेले आहेत. त्याचा फायदा आढळराव यांना होऊ शकतो.सध्या आढळरावदेखील शिवसेनेच्या माध्यमातून फारसे अ‍ॅक्टिव्ह दिसत नाहीत. त्यांचे आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे सध्या चांगले सूत जमल्याचे पाहायला मिळते.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news