

कोरेगाव भीमा : पुढारी वृत्तसेवा : कोरेगाव भीमा (ता. शिरूर) येथे मागील अनेक दिवसांपासून कचर्याचा प्रश्न नागरिकांना सतावत आहे. या समस्येवर उपाय योजना करण्याची आवश्यकता आहे, मात्र ग्रामपंचायत व स्थानिक प्रतिनिधी याकडे दुर्लक्ष करत असल्याचे दिसून येत आहे. कोरेगाव भीमामधील पंढरीनाथ नगर व वाडा पुनर्वसन रस्त्याच्या कडेने ठिकठिकाणी कचर्याचे ढिगारे साठू लागले आहेत. या रस्त्याच्या बाजूने अनेक व्यावसायिकांनी तर कचर्याचा बाजारच मांडला आहे. मात्र यावर कोणतीही कारवाई होत नसल्याचे दिसून येत आहे. कचरा व्यावसायिक आपल्या व्यवसायातून तिजोरी भरण्याचे काम करत आहे. कचरा व्यावसायिक यांचा दररोज साठत असलेल्या कचर्याचा विस्तार वाढत असून, वार्यामुळे हा कचरा रस्त्याच्या बाजूने तसेच सर्वत्र पसरू लागला आहे. या ठिकाणी पाळीव जनावरे फिरत असतात, त्यामुळे जनावरे चरत असताना त्यांच्या पोटात कचरा जाऊन दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही. याचा त्रास समस्थ ग्रामस्थांना हैराण करत आहे.
पंढरीनाथ नगर जवळील वाडा पुनर्वसन चौकामध्ये तर दिवसा ढवळ्या काही नागरिक कचर्याच्या पिशव्या जाता येता फेकत आहेत. त्यामुळे त्या ठिकाणीदेखील कचर्याचा मोठा साठा तयार झाला आहे. यावर प्रतिबंध घालण्यासाठी वाडा पुनर्वसनचे ग्रामसेवक विमल आव्हाड यांनी एक मोहीम राबविण्यात सुरुवात केली आहे. कचरा टाकणार्या व्यक्तीस 2000 रुपये प्रति दंड तर कचर्या टाकणार्या व्यक्तीचा फोटो किंवा त्यास पकडून देणार्यास 500 रुपये प्रति बक्षीस जाहीर केले आहे. मोहीम कदाचित यशस्वी होईलही, पण रस्त्याच्या कडेने असणारे कचरा व्यावसायिकांचे काय? असा प्रश्न येथील ग्रामस्थांमधून विचारला जात आहे. तसेच या व्यावसायिकांवर केव्हा कारवाई करण्यात येणार आणि हा कचर्याचा प्रश्न केव्हा सुटणार, याकडे येथील ग्रामस्थांचे लक्ष एकवटले आहे.
हेही वाचा :