पाच लाखांची सोनसाखळी केली परत | पुढारी

पाच लाखांची सोनसाखळी केली परत

तळेगाव ढमढेरे : पुढारी वृत्तसेवा :  शिक्रापूर (ता. शिरूर) येथे एसटी बसमधून प्रवास करणार्‍या प्रवाशाची पाच लाख रुपये किमतीची सोनसाखळी असलेली बॅग एसटीमध्ये विसरली. मात्र, चालक हनुमंत गुंडकर व वाहक संदीप थोरवे यांनी ही बॅग मूळ मालकाच्या स्वाधीन केली. त्यांच्या प्रामाणिकपणाचे सर्वत्र कौतुक होत आहे. सुशन वाघमारे हे कुटुंबीयांसह रविवारी (दि. 10) शिरूर येथून एसटी (एमएच 14 बीटी 1229) तून शिक्रापूर येथे आले होते. त्यांच्या बॅगेमध्ये पाच लाख रुपये किमतीची सोनसाखळी होती. बसस्थानकात खूप गर्दी होती, तसेच वाघमारे यांचे लहान बाळ रडत असल्यामुळे ते घाईगडबडीत खाली उतरले. मात्र, त्यांची बॅग एसटीतच राहिली.

संबंधित बातम्या :

बॅग विसरल्याचे लक्षात आल्यानंतर वाघमारे यांनी त्यांचा मित्र सचिन कुदळे याच्या मदतीने शिरुर बसस्थानकात संपर्क साधला. लिपिक सागर खामकर यांनी तातडीने संबंधीत एसटीचे वाहक संदीप थोरवे यांच्याशी संपर्क साधत बॅगेची खात्री करण्यास सांगितले. बॅग एसटीतच असल्याचे थोरवे यांच्या निदर्शनास आले. वाहतूक नियंत्रक सतीश सोनवणे यांच्या उपस्थित वाघमारे यांच्यासमोर बॅगेची तपासणी करण्यात आली. नंतर ती बॅग वाघमारे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली. याबाबत वाघमारे यांनी गुंडकर व थोरवे यांचे आभार मानले.

Back to top button