पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : पिंपरी-चिंचवड महापालिकेने जाधववाडी-चिखली येथील मैदानात राष्ट्रीय घोडेस्वारी प्रशिक्षण केंद्र (हॉर्स राईडींग) सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. त्यासाठी मैदान तयारही करण्यात आले. मात्र, व्यायाम व खेळाच्या सरावासाठी मैदान उपलब्ध होणार नसल्याने स्थानिक रहिवाशांनी विरोध केल्याने महापालिकेच्या क्रीडा विभागाने केंद्र सुरू करण्याबाबत माघार घेतली आहे. घोडेस्वारी केंद्र इतर ठिकाणी हलविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
शहरातील खेळाडूंना घोडेस्वारीचे प्रशिक्षण मिळावे. त्यातून राष्ट्रीय व आंतराष्ट्रीय खेळाडू तयार व्हावेत म्हणून महापालिकेने हे घोडेस्वारी केंद्र सुरू केले. महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत घोडेस्वारी केंद्राच्या ठरावास 9 एप्रिल 2023 ला आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी मान्यता दिली. प्रशिक्षण केंद्र 3 वर्ष कालावधीसाठी कृष्णा सामाजिक सेवा प्रतिष्ठान या संस्थेला देण्यात आले आहेत. त्या संदर्भात करारनामाही करण्यात आला आहे. त्या माध्यमातून शहरातील खेळाडूंना घोडेस्वारीचे तंत्रशुद्ध प्रशिक्षण दिले जाणार आहे. तेथे एकूण प्रशिक्षणार्थीपैकी 40 टक्के शालेय विद्यार्थ्यांना मोफत प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
या केंद्रासाठी त्या मैदानास सीमा भिंत टाकण्यात आली आहे. मैदानावर खोल्या तसेच, स्वच्छतागृह बांधण्यात आले आहे. सरावासाठी आवश्यक साहित्य लावण्यात आले. लवकरच प्रशिक्षण केंद्र प्रत्यक्षात सुरू करण्यात येणार होते. या केंद्रामुळे स्थानिकांना सराव, व्यायाम व खेळासाठी मैदान राहणार नाही. त्यामुळे घोडेस्वारी केंद्राच्या विरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या रूपाली आल्हाट यांनी मंगळवारपासून (दि.28) उपोषण आंदोलन सुरू केले होते. तसेच, महापालिकेवर शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व मनसेच्या वतीने मोर्चा काढण्यात आला.
नागरिकांच्या सह्यांची मोहिम राबविण्यात आली. अखेर, महापालिकेच्या क्रीडा विभागाने या मैदानात सुरू होणारे घोडेस्वारी प्रशिक्षण केंद्र रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. ते केंद्र इतर ठिकाणी स्थलांतरीत करण्यात येणार आहे. त्या संदर्भातील पत्र क्रीडा विभागाचे उपायुक्त मिनीनाथ दंडवते यांनी उपोषणकर्त्यांना दिले आहे. त्यानंतर उपोषण आंदोलन मागे घेण्यात आले. दरम्यान, भाजपसह राष्ट्रवादी काँग्रेसनेही (अजित पवार गट) या केंद्रास विरोध दर्शविला होता.
राष्ट्रीय घोडेस्वारी प्रशिक्षण केंद्र रद्द करण्यात आलेले नाही. ते केंद्र इतर ठिकाणी हलविण्यात आले आहे. योग्य जागेचा शोध घेऊन तेथे हे प्रशिक्षण सुरू करण्याचे नियोजन आहे. त्यासाठी दीड ते दोन महिन्यांचा कालावधी लागणार आहे. त्यासंदर्भात कृष्णा सामाजिक सेवा प्रतिष्ठान या संस्थेला कळविण्यात येईल, असे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे यांनी सांगितले.
हेही वाचा