

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : राज्यभरात अंगणवाडी सेविकांनी आपल्या विविध मागण्यांसाठी 4 डिसेंबरपासून बेमुदत बंद पुकारला आहे. आज बंदला 10 दिवस उलटूनही मागण्यांबाबत शासनाकडून निर्णय घेण्यात येत नाही. त्यामुळे अंगणवाडी सेविकांनीदेखील मागण्या मान्य होईपर्यंत बंद सुरू ठेवण्याचा पवित्रा घेतल्यामुळे अंगणवाडीत येणारे चिमुकले मात्र पोषण आहारापासून वंचित झाले आहेत.
पिंपरी-चिंचवड महापालिकेमार्फत शहराच्या विविध भागात एकात्मिक बालविकास प्रकल्पांतर्गत शासनामार्फत 300 पेक्षा अधिक अंगणवाड्या चालविल्या जातात.
अंगणवाडीमध्ये येणारी मुले ही आर्थिक दुर्बल घटकातील, बिगारी काम करणारे, हातावरचे पोट असणार्या कुटुंबांतील आहेत. शासनाकडून येणारा पोषण आहार मुलांपर्यंत योग्य प्रकारे पोहोचविण्यात अंगणवाडीसेविकांची भूमिका महत्त्वाची असते. सध्या बंदमुळे मुलांचा पोषण आहार बंद आहे.
अनेक वर्षांपासून सेविका आणि मदतनीस मानधन वाढीसाठी संघर्ष करत आहेत. सरकारी कर्मचार्यांचा दर्जा देण्याची त्यांची प्रमुख मागणी आहे. यामध्ये बहुतांश अंगणवाडी सेविका आणि मदतनीस या विधवा आणि परित्यक्ता आहेत. त्यांच्या कुटुंबाची जबाबदारी त्यांच्यावरच असते. तुटपुंज्या पगारावर संसाराचा गाडा त्यांना हाकावा लागतो. वाहतूक खर्चही त्यांना स्वत:च करावा लागतो. त्यांना मिळणारे मानधन अत्यल्प आहे. मानधनामध्ये वाढ करावी म्हणून बेमुदत बंदचे आंदोलन पुकारले आहे.
हेही वाचा