स्तनाच्या कर्करोगातून मुक्त झाला ‘हा’ पुरुष! | पुढारी

स्तनाच्या कर्करोगातून मुक्त झाला ‘हा’ पुरुष!

लंडन : काही आजारांबाबत लोकांमध्ये भलतेच गैरसमज असतात किंवा अपुरी माहिती असते. महिलांना स्तनांचा कर्करोग म्हणजेच ब्रेस्ट कॅन्सर होणं हे तशी सामान्य बाब आहे. स्तनांमधील पेशींची गरजेपेक्षा अधिक वाढ होते तेव्हा सामान्यपणे स्तनांच्या कर्करोगाचा धोका असतो असे सांगितले जाते. या पेशींचे ट्यूमर स्तनांमध्ये तयार होतात. मात्र, महिलांप्रमाणे पुरुषांनाही ब्रेस्ट कॅन्सर झाल्याचे तुम्ही कधी ऐकले आहे का? होय, पुरुषांनाही ब्रेस्ट कॅन्सरचा धोका असतो.

ब्रिटनमधील कार्डिफ येथे राहणार्‍या माइक रॉसिटर नावाच्या पुरुषाला ब्रेस्ट कॅन्सर झाला होता व आता ते यामधून मुक्त झाल्याची माहिती समोर आली आहे. स्तनांमध्ये गाठ तयार होईपर्यंत माइक यांना या आजाराबद्दल पुसटशीही कल्पना नव्हती. काही काळानंतर त्यांना छातीजवळ गाठ आल्यासारखे वाटल्याने त्यांनी डॉक्टरांकडे जाऊन तपासणी करून घेतल्या. आरोग्यासंदर्भातील काही चाचण्या करुन घेतल्यानंतर त्यांना ब्रेस्ट कॅन्सर असल्याचे स्पष्ट झाले. धावताना अनेकदा त्वचा आणि परिधान केलेल्या कपड्यांमध्ये घर्षण होते. त्यामुळे स्तनावरील वक्षस्थळाला इजा होते.

याला वैद्यकीय भाषेमध्ये रेड इलेव्हन, रावर्स पिपल, बिग क्यूएस अशी नावे आहेत. स्तनांमधून रक्तस्राव होतो आणि जखमेचा आकार वाढू लागतो. त्यामुळेच मॅरेथॉन धावणारे खेळाडू छातीवर तसेच त्वचेवर व्हॅसलिन लावून धावतात. माइक हे 2014 मध्ये मॅरेथॉनच्या प्रशिक्षणादरम्यान छातीवर व्हॅसलिन लावत असताना त्यांना स्तनांजवळ गाठी निर्माण झाल्याचे जाणवले. माइक यांनी घाबरून न जाता यासंदर्भात लोकांकडून सल्ले घेतले. बायोप्सीनंतर त्यांना स्तनांचा कर्करोग झाल्यावर शिक्कामोर्तब झाले. हे एक धक्का असला तरी आपण याबद्दल आधी कधीही ऐकलं नव्हतं. त्यामुळे माझ्या यासंदर्भात संमिश्र आणि गोंधळलेल्या भावना होत्या, असे माइक म्हणाले.

‘नशिबाने माझी पत्नी माझ्यासोबत होती. तिने मला लगेच तुला ब्रेस्ट कॅन्सर झाल्याची शक्यता व्यक्त केल्यानंतर आम्ही चाचण्या करून घेतल्या. खरं तर पुरुषांनाही ब्रेस्ट कॅन्सर होऊ शकतो याचा अंदाज नव्हता. मला कल्पना आहे की 99 टक्के पुरुषांनाही कल्पना नसेल की त्यांना ब्रेस्ट कॅन्सर होऊ शकतो,’ असे माइक म्हणाले. माईक यांच्यावरील उपचार पूर्ण झाले असून त्यांनी कॅन्सरवर मात केली आहे. आता ते ब्रेस्ट कॅन्सरसंदर्भातील जनजागृतीसाठी काम करतात. स्तनांमध्ये गाठ निर्माण होणे, छातीवर पुरळ उठतं (छोट्या पुळ्या येणे) कधीतरी काखेतही गाठ येते, असं पुरुषांमधील ब्रेस्ट कॅन्सरची लक्षण सांगताना माइक यांनी सांगितलं. असं काहीही असेल तर चाचणी करुन घ्यावी असला सल्ला माइक देतात.

Back to top button