Pune News : अखेर सिंहगड डागडुजीला मुहूर्त | पुढारी

Pune News : अखेर सिंहगड डागडुजीला मुहूर्त

खडकवासला : पुढारी वृत्तसेवा : पर्यटकांसह विक्रेत्यांवर दुर्घटनांची टांगती तलवार असलेल्या सिंहगड किल्ल्याच्या कल्याण दरवाजाच्या डागडुजीला अखेर मुहूर्त मिळाला आहे. पुढील आठवड्यात दुरुस्तीचे काम सुरू होणार आहे. सिंहगड किल्ल्यावर पर्यटकांना पायाभूत सुविधा उपलब्ध होण्यासाठी आणि गडाच्या विकासकामासाठी प्रादेशिक पर्यटन विकास योजनेअंतर्गत पावणेचार कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. राज्य शासनाच्या पुरातत्त्व विभागाच्या वतीने या निधीतून कोसळलेल्या भागासह इतर दुरुस्तीची कामे करण्यात येणार आहेत. अनेक महिन्यांपासून डागडुजीचे काम रखडले होते.
अखेर आता  प्रत्यक्ष कामांना सुरुवात करण्यात येणार आहे. त्यासाठी नांदेड जिल्ह्यातील देगलूर येथून चिरेबंदी दगड आणण्यात आले आहेत. पुरातत्व विभागाचे सहसंचालक डॉ. विलास वाहणे म्हणाले,  कोसळलेल्या बुरुज- तटबंदीसह कल्याण दरवाजाची   डागडुजी करण्यात येणार आहे. शिवकालीन बांधकाम शैलीत चुन्यात दगडी बांधकाम करण्यात येणार आहे. जवळपास बारा मीटर लांबीचा मूळ चौथरा आहे. त्यामुळे पायापासून दगडी बांधकाम करण्यात येईल.
याशिवाय इतर आवश्यक दुरुस्तीची कामे करण्यात येणार आहेत. छत्रपती शिवाजी महाराज, नरवीर तानाजी मालुसरे व वीर मावळ्यांच्या शौर्याचा वारसा जतन करणार्‍या सिंहगडावरील ऐतिहासिक वास्तूस्थळांचे संवर्धन तसेच पर्यटकांची सुरक्षा, मूलभूत सुविधा उपलब्ध होण्यासाठी आमदार भीमराव तापकीर यांनी शासनाचे लक्ष वेधले आहे. आमदार तापकीर यांच्या प्रयत्नातून प्रादेशिक पर्यटन विकास योजनेंतर्गत प्रथमच सिंहगडाच्या विकासासाठी भरीव निधी मंजूर करण्यात आला आहे. तोफगोळे असलेला डोंगरी किल्ला
कल्याण दरवाजाची पाहणी करताना दरवाजाच्या बुरुजात दोन तोफगोळे सापडले.
तोफगोळे बाहेर काढून डागडुजी करण्यात येणार आहे. उंच कड्यावरील दुर्गम दरवाजात तोफगोळे पाहून अधिकारी अचंबित झाले. शत्रूंनी तोफांचा भडीमार केल्याच्या पाऊल खुणा तटबंदीत सापडत आहेत. मात्र सिंहगडसारख्या अभेद्य डोंगरी किल्ल्याच्या भिंतीत तोफगोळे सापडल्याने पुरातत्त्व विभागाने आश्चर्य व्यक्त केले आहे.
कल्याण दरवाजाच्या डागडुजीसह  गडावर ऐतिहासिक स्थळांचे जतन व संवर्धन व्हावे. पर्यटकांना पायाभूत सुविधा उपलब्ध व्हावी. यासाठी प्रादेशिक पर्यटन योजनेतून हा निधी मिळाला आहे.   विविध योजनांतर्गत गडाच्या विकासासाठी आवश्यक निधी मिळावा यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
– भीमराव तापकीर, आमदार
हेही वाचा

Back to top button