काय सांगता? जगातील सर्वात मोठा चित्रपट…तीन दिवसांचा! | पुढारी

काय सांगता? जगातील सर्वात मोठा चित्रपट...तीन दिवसांचा!

न्यूयॉर्क : आपल्याकडे सर्वात मोठे चित्रपट बनवण्याचा ट्रेंड राज कपूर यांनी सुरू केल्याचे मानले जाते. ‘मेरा नाम जोकर’ असाच मोठा चित्रपट होता. त्यानंतरच्या काळात तीन-तीन तास सुरू राहणारे अनेक चित्रपट येऊन गेले. अगदी अलीकडचा ‘अ‍ॅनिमल’ चित्रपटही तीन तास 21 मिनिटांचा आहे. मात्र, जगातील सर्वात मोठा चित्रपट कोणता आहे हे तुम्हाला माहिती आहे का? या चित्रपटाचे नाव आहे ‘द क्यूअर फॉर इन्सोम्निया’. 1987 मध्ये हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. तो तब्बल तीन दिवस आणि पंधरा तास सुरू राहणारा चित्रपट आहे! ( The biggest film in the world )

हॉलीवूडच्या या चित्रपटाची नोंद गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डस्मध्येही आहे. जॉन हेन्री टिमिस -चौथा यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते. त्याचा रनटाईम 5,220 मिनिटांचा आहे. याचा अर्थ हा चित्रपट तब्बल 87 तास सुरू राहतो. तो संपण्यासाठी तीन दिवस आणि पंधरा तास लागतात. या दीर्घ चित्रपटात इतके आहे तरी काय, असा प्रश्न अनेकांना पडू शकतो. या चित्रपटात कोणताही प्लॉट किंवा कथा नाही हे विशेष! यामध्ये एलडी ग्रोबन आपली 4,080 पानांची कविता वाचत असताना दिसून येतो. चित्रपटात कुठे कुठे पोर्नोग्राफिक व्हिडीओ आणि हेवी मेटल म्युझिक वापरले आहे.

‘द क्युअर फॉर इन्सोम्निया’ हा चित्रपट सर्वप्रथम शिकागोच्या ‘स्कूल ऑफ द आर्ट इन्स्टिट्यूट’ मध्ये दाखवण्यात आला होता. तिथे हा चित्रपट 31 जानेवारी 1987 ला दाखवण्यास सुरुवात झाली आणि तो 3 फेब्रुवारी 1987 या दिवशी संपला! त्यावेळी हा चित्रपट सतत, कोणत्याही ब्रेकशिवाय दाखवला गेला. त्यावेळी त्याला इतका कालावधी लागला होता. हा चित्रपट कोणतीही डीव्हीडी किंवा होम व्हिडीओ फॉर्मेटमध्ये रीलिज केला गेला नसल्याचे सांगितले जाते. त्याच्या सर्व प्रती आता कुठे आहेत याची कुणालाही माहिती नाही. चित्रपटाच्या बहुतांश प्रती हरवल्या असल्याचेही म्हटले जाते! या चित्रपटाचा उद्देश काय, असाही प्रश्न अनेकांना पडू शकतो. ज्यांना झोपेची समस्या आहे त्यांच्यासाठी हा चित्रपट बनवला गेला होता. चित्रपटाचे शीर्षकही निद्रानाशाच्या आजाराचेच आहे!

Back to top button