Pimpri News : चुकीची कारवाई थांबवा अन्यथा तीव्र आंदोलन छेडू | पुढारी

Pimpri News : चुकीची कारवाई थांबवा अन्यथा तीव्र आंदोलन छेडू

मोशी : मैलाशुद्धीकरण केंद्र बंद असलेल्या 41 सोसायटीधारकांचे नळ कनेक्शन तोडण्याची चुकीची कारवाई महापालिकेने सुरू केली आहे. ही कारवाई थांबवा अन्यथा तीव्र आंदोलन छेडू, असा इशारा चिखली-मोशी-पिंपरी चिंचवड हाऊसिंग सोसायटी फेडरेशनने महापालिकेला दिला आहे. तसेच, चुकीचा अहवाल देणार्‍या महापालिकेचे संबंधित अधिकारी आणि विकसकावरदेखील कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.

एसटीपी निकृष्ट दर्जाचे

फेडरेशनने निवेदनात नमूद केले आहे, की आयुक्त शेखर सिंह यांच्याबरोबर पत्रव्यवहार करून या गोष्टीला विरोध दर्शवला होता. सदर सहकारी गृहरचना संस्थांच्या मैलाशुद्धीकरण केंद्र बसवताना संबंधित सर्व 41 सोसायट्यांच्या विकसकांनी या यंत्रणा अतिशय निकृष्ट दर्जाच्या बसवलेल्या आहेत. तसेच, सोसायटी हस्तांतरण करत असताना कोणत्याही प्रकारची सोसायटी धारकांची संमती घेतली नाही. एसटीपी बंद अवस्थेत असतानादेखील त्या सोसायटीधारकांच्या माथी मारलेल्या आहेत.

खासगी ठेकेदारांच्या  सर्वेक्षणात गडबड

पालिकेने हे मैलाशुद्धीकरण प्रकल्प पाहणी करण्यासाठी नेमलेल्या खासगी ठेकेदारांच्या कर्मचार्‍यांनी याचे सर्वेक्षण व्यवस्थित केलेले नाही. यातील काही एसटीपी प्रकल्प हे सुरू असल्याचे पत्र आयुक्तांना दिले होते. संबंधित सर्व गोष्टीची चौकशी करून यावर निर्णय घ्यावा, असे सांगितले होते. तरीदेखील सोसायटीचे नळ कनेक्शन कट करण्याची मोहीम सुरू केलेली आहे.

अधिकार्‍यांवर कारवाईची मागणी

विकसक, बांधकाम विभागाच्या अधिकार्‍यांवर कारवाई करावी, फेडरेशनच्या पदाधिकार्‍यांशी बैठक घेऊन तक्रारीची चौकशी करावी, मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत ही मोहीम स्थगित करावी, ही मागणी केली आहे.
महापालिकेच्या पर्यावरण विभागाकडून शहरातील 41 सहकारी गृहरचना संस्थांना एसटीपी बंद असल्याने नळ कनेक्शन कट करण्याबाबत नोटीस दिल्या होत्या. त्याला फेडरेशनकडून विरोध आणि आक्षेप घेतला होता; परंतु आज पर्यावरण विभागाच्यामार्फत या 41 सोसायट्यांचे नळ कनेक्शन कट करण्याची मोहीम सुरू केलेली आहे. पालिकेने ही मोहीम स्थगित केली नाही, तर फेडरेशन मार्फत आंदोलन उभारले जाईल.
– संजीवन सांगळे,  अध्यक्ष, चिखली-मोशी- पिंपरी चिंचवड हाऊसिंग सोसायटी फेडरेशन 
हेही वाचा

Back to top button