पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : महापालिकेच्या संभाजीनगर, चिंचवड येथील येथील निसर्गकवी बहिणाबाई चौधरी प्राणिसंग्रहालयास गेल्या सात वर्षांपासून टाळे आहे. तेथील कामांवर कोट्यवधीचा खर्च झाला आहे. मात्र, अजून सुरूच आहे. तसेच, 36 प्राण्यांच्या झालेला मृत्यू आदी कारणांमुळे या प्राणिसंग्रहालयाचा मुद्दा नागपूर येथे सुरू असलेल्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात चांगलाच तापला.
पहिल्या व दुसर्या टप्प्यातील कामासाठी प्राणिसंग्रहालय सात वर्षे बंद आहे.
आतापर्यंत 19 कोटी खर्च झाले. तरी, काम पूर्ण न झाल्याने प्राणिसंग्रहालय बंद आहे. संबंधित ठेकेदार व सल्लागारावर कारवाई न करता पालिका त्यांना अभय देत आहे का, असा प्रश्न त्यांनी मांडला. तसेच, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार व आमदार नाना पटोले यांनी या कामात भ्रष्टाचार झाला असून, केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाच्या नियम बाजूला सारून बेसुमार खर्च करण्यात आला आहे. प्रशासनाच्या हलगर्जी पणामुळे 36 प्राण्यांचा मृत्यू झाला आहे. संबंधित अधिकार्यांवर कारवाई करण्याची मागणी लावून धरली.
दरम्यान, उद्योगमंत्री उदय सामंत यांनी या प्राणिसंग्रहालयाबाबत भूमिका मांडली. हे सर्पोद्यान व प्राणिसंग्रहालय 1991 मध्ये सुरू झाले. 2008 मध्ये त्याचे सुशोभीकरण करण्याचे ठरले.
प्राणिसंग्रहालयास 2 जून 2006 ला केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाने परवानगी दिली. टप्पा एक आणि दोनमध्ये याचे काम करण्याचे ठरले. पहिल्या टप्प्यात 14 कोटी 13 लाख 77 हजार रुपये खर्च करण्यात आले. तर, दुसर्या टप्प्यात 6 कोटी 92 लाख 469 हजार खर्च करण्यात आले. केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाच्या नियमा प्रमाणे काही कामे करावयाची असल्याने संग्रहालय खुले करण्यात आलेले नाही.
प्राणिसंग्रहालय आणि तेथील प्राण्यांच्या मृत्यूसंदर्भात चिंचवड आमदार अश्विनी जगताप यांनी प्रश्न उपस्थित केला होता. त्यावर मंगळवार (दि. 12) चर्चा झाली. हे प्राणिसंग्रहालय सुशोभीकरण व नूतनीकरणाचे कामासाठी सन 2017 पासून टाळे आहे. त्यामुळे पर्यटन बंद असल्याने शहरातील नागरिकांना पुण्यातील कात्रज येथील राजीव गांधी प्राणिसंग्रहालयात जावे लागते. यासंदर्भात 'पुढारी'ने वारंवार ठळक वृत्त प्रसिद्ध करून पाठपुरावा केला आहे.
सन 2017 ते सन 2023 या कालावधीत एकूण 36 प्राणी मृत्युमुखी पडले आहेत. त्यात काही प्राण्यांचा मृत्यू नैसर्गिकरीत्या व हवामान बदलामुळे झाल्याचा अहवाल औंध येथील शासकीय रुग्णालयामार्फत शवविच्छेदन करून प्राधिकरणाला महापालिकेने कळविले आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उत्तर देताना सांगितले की, प्राणिसंग्रहालयातील 36 प्राण्यांचा मृत्यू ही गंभीर बाब आहे. त्याची नगरविकास खात्याचे प्रधान सचिवांच्या माध्यमातून चौकशी करण्यात येणार आहे. वन विकास महामंडळाकडे हे प्राणिसंग्रहालय हस्तांतरीत करण्याचे निर्देश त्यांना महापालिकेस दिले.