इंदापुरात यापुढे ‘बंद’ नको ; व्यापार्‍यांची मागणी | पुढारी

इंदापुरात यापुढे ‘बंद’ नको ; व्यापार्‍यांची मागणी

इंदापूर : पुढारी वृत्तसेवा :  वारंवार विविध कारणांमुळे इंदापूर शहर बंद पुकाराला जात असल्याने यामुळे होणारे व्यापार्‍यांचे नुकसान, गळचेपी थांबविण्यासाठी यापुढे इंदापूर बंद पुकारू नये, अशी भूमिका इंदापूर शहर व्यापारी असोसिएशनने घेतली आहे. मंगळवारी (दि. 12) डिसेंबरला शहरातून मोर्चा काढत या संदर्भातील लेखी निवेदन इंदापूरचे तहसीलदार श्रीकांत पाटील आणि इंदापूर पोलिसांना व्यापारी वर्गाने दिले आहे. या निवेदनावर अध्यक्ष भरत शहा, उपाध्यक्ष संदीप वाशिंबेकर, सचिव मेघशाम पाटील, सहसचिव दिलीप कासार यांच्यासह शहरातील अनेक छोट्या-मोठ्या व्यापार्‍यांच्या स्वाक्षर्‍या आहेत. यापुढे इंदापूर शहर व्यापारी संघाच्या वतीने व्यवसाय, उद्योगांना मारक ठरणार्‍या अशा बंदला आम्ही आमची दुकाने व व्यवसाय बंद ठेवणार नाही, असा निर्णय घेण्यात आला आहे.

संबंधित बातम्या :

विविध संघटना, पक्षांकडून वेळोवेळी काही घटना घडल्यास त्याचा निषेध म्हणून इंदापूर शहर बंदचे आवाहन करण्यात येते. शहरातील सर्व व्यापारी वर्ग, लघुद्योग, फेरीवाले, पथारीवाले व इतर पदपथावरील छोट्या व्यावसायिकांना बंदमध्ये सहभागी व्हावे लागते. असे बंद वारंवार झाल्यामुळे व्यापार्‍यांचे, लघू, मध्यम व्यवसाय असणार्‍यांचे, दुकानात असणार्‍या कामगार, मोलमजुरी करणार्‍यांचे अतोनात नुकसान होत आहे.

मागील काही वर्षांमध्ये कोरोना काळ व ऐन दसरा, दिवाळी इतर सणावारांच्या हंगामात बंद पुकारण्यात आले. आम्ही वेळोवेळी ही बाब प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिलेली आहे. इंदापूर शहर व्यापारी संघाच्या वतीने निवेदने दिलेली आहेत. याविषयी प्रशासन आणि सामाजिक संघटना, सर्वच पक्षांनी याची दखल घेतलेली नाही, याचा गांभीर्याने विचार करून व्यावसायिकांचे नुकसान होणार नाही याची खबरदारी घेऊन योग्य ती कार्यवाही करावी, अशी मागणी इंदापूर शहर व्यापारी असोसिएशने निवेदनाद्वारे केली आहे.

 

Back to top button