विद्यार्थ्यांची मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती प्रलंबित | पुढारी

विद्यार्थ्यांची मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती प्रलंबित

पुणे : पुढारी वृत्तसेवा : राज्यातील इतर मागास वर्ग, अनुसूचित जाती, विमुक्त जाती आणि भटक्या जमातीच्या विद्यार्थ्यांची मॅट्रिकोत्तर शिष्यवृृृत्ती प्रलंबित आहे. 2023-24 या वर्षात 1 हजार 435 कोटी 43 लाख रुपये निधी वितरित करण्यात आला आहे. तर प्रलंबित अर्ज आणि मार्च 2024पर्यंतच्या अपेक्षित अर्जांसाठी 1 हजार 750 कोटी रुपयांची पुरवणी मागणी करण्यात आली असून, या रकमेतून प्रलंबित शिष्यवृत्ती विद्यार्थ्यांना वितरित केली जाणार आहे.

इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांनी ही माहिती दिली. विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात आमदारांकडून मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्तीची रक्कम प्रलंबित असल्याबाबत प्रश्न उपस्थित करण्यात आला होता. या प्रश्नाला सावे यांनी उत्तर दिले. राज्यातील महाविद्यालयांनी शासनाच्या विविध शैक्षणिक विभाग, शिक्षण शुल्क समिती, विद्यापीठांकडून मान्य होणारे शिक्षण शुल्क वेळेत संकेतस्थळावर संबंधित यंत्रणांकडून अद्ययावत करणे आवश्यक आहे.

महाविद्यालयांकडून किंवा सक्षम यंत्रणांकडून संकेतस्थळावर शुल्क अद्ययावत करणे प्रलंबित असल्यास शिष्यवृत्ती वितरणास विलंब होतो. तसेच महाविद्यालय स्तरावर अर्ज प्रलंबित राहतात. अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना राज्य शासनाचा 40 टक्के हिश्याची रक्कम वितरित करण्यात आली आहे.

मात्र, केंद्र शासनाकडून थेट विद्यार्थ्यांना दिल्या जाणार्‍या 60 टक्के हिश्याबाबतचे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने केंद्राच्या हिश्याची रक्कम
प्रलंबित आहे. केंद्राच्या हिश्याची रक्कम केंद्र सरकाकडून दिली जाईल. या बाबत विद्यार्थ्यांची शैक्षणिक अडवणूक न करण्याबाबत परिपत्रकाद्वारे सूचना देण्यात आल्याचे सावे यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा

Back to top button