Pune News : आजपासून सवाईचा स्वरयज्ञ; कलाकारांमध्ये कमालीचा उत्साह | पुढारी

Pune News : आजपासून सवाईचा स्वरयज्ञ; कलाकारांमध्ये कमालीचा उत्साह

पुणे : पुढारी वृत्तसेवा : पुण्यातील सांस्कृतिक वैभवाचा भाग असलेला 69 व्या सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाचा स्वरयज्ञ आजपासून रंगणार असून, महोत्सवात दिग्गजांसह नवोदित कलाकारांच्या कलाविष्काराचा नजराणा पाहण्याची पर्वणी रसिकांना मिळणार आहे. महोत्सवाची तयारी पूर्ण झाली आहे. रसिकांना सवाईच्या स्वरयज्ञात सुरेल स्वरांची, वादनाची अनुभूती मिळणार आहे. बुधवारी (दि. 13) दुपारी 3 वाजता या सांगीतिक स्वरयज्ञाला तुकाराम दैठणकर आणि सहकारी यांच्या मंगलमय सनईवादनाने सुरुवात होईल.

आर्य संगीत प्रसारक मंडळाच्या वतीने आयोजिलेल्या सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाची तयारी पूर्ण झाली आहे. कार्यक्रमस्थळी हजारो संगीत रसिकांना सामावून घेणार्‍या मांडवाची उभारणी करण्यात आली आहे. त्यासोबतच रंगमंचाचीही तयारी झाली असून, विद्युत रोषणाईही करण्यात आली आहे. बुधवारी (दि.13) तुकाराम दैठणकर आणि सहकार्‍यांच्या सनईवादनानंतर किराणा घराण्याचे गायक संजय गरुड आपली गायनसेवा सादर करतील. पं. कुमार गंधर्व यांच्या जन्मशताब्दीनिमित्त त्यांच्या कन्या आणि शिष्या कलापिनी कोमकली यांचे गायन होईल. यानंतर तेजेंद्र नारायण मजुमदार यांचे सरोदवादन होणार आहे.

पहिल्या दिवसाची सांगता पं. उल्हास कशाळकर यांच्या गायनाने होईल. या स्वरयज्ञात 13 ते 17 डिसेंबर या कालावधीत रसिकांना वैविध्यपूर्ण संगीतश्रवणाची पर्वणी मिळणार आहे. मुकुंदनगर येथील महाराष्ट्रीय मंडळाच्या क्रीडासंकुल येथे महोत्सव रंगणार आहे. पं. कुमार गंधर्व, पं. राम मराठे आणि पं. सी. आर. व्यास या तिन्ही दिग्गज कलाकारांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त त्यांच्या परंपरेतील कलाकार त्यांना कला सादरीकरणातून अभिवादन करणार असून, हे यंदाच्या महोत्सवाचे खास वैशिष्ट्य ठरणार आहे.

महोत्सवासाठी येणार्‍या रसिकांच्या दुचाकी व चारचाकी वाहनांसाठी पार्किंग, मोठ्या एलईडी स्क्रीन्स, खाद्यपदार्थांचे स्टॉल्स आदी सुविधा महोत्सवाच्या ठिकाणी असणार आहेत. महोत्सवानंतर घरी जाण्यासाठी काही बसमार्गांवर पीएमपीएमएलची सेवा उपलब्ध असतील. मुकुंदनगर ते कार्यक्रमानंतर भक्ती शक्ती चौक, निगडी, मुकुंदनगर ते कार्यक्रमानंतर सिंहगड रस्ता (मारुती मंदिर, धायरी), मुकुंदनगर ते कार्यक्रमानंतर कोथरूड डेपो (पौड रस्ता) आणि मुकुंदनगर ते पुन्हा कार्यक्रमानंतर वारजे माळवाडी या मार्गावर सेवा उपलब्ध असणार आहे, असे मंडळाचे कार्याध्यक्ष श्रीनिवास जोशी यांनी सांगितले.

हेही वाचा

Back to top button