हॅलेच्या धूमकेतूने सुरू केला परतीचा प्रवास | पुढारी

हॅलेच्या धूमकेतूने सुरू केला परतीचा प्रवास

वॉशिंग्टन : सुमारे 40 वर्षांपूर्वी हॅलेच्या धूमकेतूने पृथ्वीला रामराम ठोकून पुढचा प्रवास सुरू केला होता. आता त्याने पृथ्वीच्या दिशेने परतीचा प्रवास सुरू केला आहे. हा धूमकेतू 2061 मध्ये पृथ्वीजवळून जाईल.

शनिवारी म्हणजेच 9 डिसेंबरला हा धूमकेतू सूर्यापासून सर्वाधिक दूरवरच्या बिंदूवर होता. याचा अर्थ यावेळी तो त्याच्या ‘अ‍ॅफेलिऑन’वर होता. हे अंतर 35 अस्ट्रॉनॉमिकल यूनिटस्चे असून ते पृथ्वी आणि सूर्यादरम्यानच्या अंतराच्या 35 पट अधिक आहे, अशी माहिती ‘नासा’ने दिली आहे. अर्थातच हा धूमकेतू नेपच्यूनच्या कक्षेच्याही पुढे असून जवळजवळ प्लूटोच्या अंगणातच आहे! प्लूटोची कक्षा ही सुमारे 39 एयूची आहे.

हॅलेचा धूमकेतू सूर्याभोवती 76 वर्षांमध्ये एक प्रदक्षिणा पूर्ण करतो. त्याच्या या कक्षेच्या मध्यभागी तो असल्याचे दिसते. गेल्या 38 वर्षांच्या काळात तो रोज अनेक दशलक्ष मैल पुढे जात होता. आता त्याला पुन्हा पृथ्वीजवळ येण्यासाठी आणखी 38 वर्षे लागतील. खगोलशास्त्रज्ञ एडमंड हॅले यांनी सन 1682 मध्ये या धूमकेतूचा शोध लावला होता. त्यांना हे नेमके काय आहे याचे त्यावेळी आकलन झाले नव्हते व त्यांनी त्याला ‘केसाळ तारा’ (हेअरी स्टार) असे संबोधले होते.

Back to top button