श्रीराम मंदिराचे बांधकाम पूर्ण होण्यास तीन वर्षे : स्वामी गोविंददेव गिरी महाराज | पुढारी

श्रीराम मंदिराचे बांधकाम पूर्ण होण्यास तीन वर्षे : स्वामी गोविंददेव गिरी महाराज

पुणे : पुढारी वृत्तसेवा : श्रीरामरायाच्या दर्शनासाठी सुविधा 22 जानेवारीपासून उपलब्ध होणार आहे. दोन मजल्याची बांधणी व्हायची आहे. श्रीराम मंदिराचे बांधकाम पूर्ण होण्यासाठी आणखी तीन वर्षे लागतील, अशी माहिती श्रीराम जन्मभूमी न्यासाचे कोषाध्यक्ष स्वामी गोविंददेव गिरी महाराज यांनी दिली. अयोध्येतील श्रीराम जन्मभूमी मंदिरातील श्रीरामाच्या मूर्तीसाठी वस्त्र विणण्याचा ‘दो धागे श्रीराम के लिए’ हा उपक्रमाच्या शुभारंभासाठी ते पुण्यात आले होते. या वेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. गोविंददेव गिरी महाराज म्हणाले, श्रीराम मंदिराचे काम अत्यंत वेगाने सुरू आहे. प्राणप्रतिष्ठेसाठी आवश्यक तितकेच म्हणजेच श्रीरामरायाला विराजमान करण्याइतपत बांधकाम डिसेंबर अखेरपर्यंत पूर्ण होणार आहे.

संबंधित बातम्या :

श्रीराम मंदिराच्या पहिल्या मजल्याचे काम फक्त होणार आहे. गाभार्‍याचे काम पूर्ण होऊन सर्वांना श्रीरामरायाच्या दर्शनासाठी सुविधा उपलब्ध होईल. हे ऐतिहासिक मंदिर असून, त्याचे काम तीन वर्षांत पूर्ण व्हावे, अशी अपेक्षाही करणे चुकीचे आहे. मंदिराच्या वरच्या मजल्याचे काम चालू राहील. आम्हालाही घाई एवढ्यासाठी आहे की प्रभू श्रीरामरायाने कपड्याच्या तंबूमध्ये अनेक वर्षे काढली. त्यामुळे लवकरात लवकर श्रीरामरायाला विराजमान करावे म्हणून प्राणप्रतिष्ठा केली जाणार आहे. हे गणपती मंडळाने रंगरंगोटी करून एखादा देखावा उभा करावा अशाप्रकारचे काम नाही. हजारो वर्षे टिकेल असे मंदिर उभे करायचे असल्याचे महाराज म्हणाले.

श्रीराम मंदिरामध्ये श्रीरामरायाची प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी भाजपकडून घाई केली जात आहे, असे पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर स्वामी गोविंददेव गिरी महाराज म्हणाले, प्रत्येक जण आपापल्या दृष्टिकोनाप्रमाणे विचार करीत असतो. आमचा दृष्टिकोन भक्तिभावाचा असून, ज्यांचा राजकारणाचा आहे, त्यांना असे वाटणे स्वाभाविक आहे, असे सांगत या विषयावर पडदा टाकला. मात्र, श्रीराम मंदिर दर्शन 22 जानेवारीपासून अव्याहतपणे राहणार आहे.

 

Back to top button