छत्रपती श्रीशिवरायांचा ज्वलंत वारसा जगासमोर येणार | पुढारी

छत्रपती श्रीशिवरायांचा ज्वलंत वारसा जगासमोर येणार

दत्तात्रय नलावडे

खडकवासला : राजगड किल्ल्याप्रमाणे गडाच्या पायथ्याच्या शिवपट्टण स्थळाला ऐतिहासिक वारसा आहे. शेकडो वर्षे काळाच्या ओघात लुप्त झालेला शिवपट्टण वास्तूंचा इतिहास ऐतिहासिक प्रकल्पामुळे पुन्हा जिवंत होणार आहे. शिवपट्टण येथे छत्रपती श्रीशिवरायांचा राजवाडा, स्वराज्याच्या कारभाराच्या कचेर्‍या, अंगरक्षक, शिलेदार, शिवबंदीची निवासस्थाने होती. येथे व्यापार्‍यांसह परदेशी पाहुण्यांची ये-जा असे. तसेच बाजार भरत असे. काळाच्या ओघात या सर्व वास्तू लुप्त झाल्या. जमिनदोस्त झालेली बांधकामे, राजवाडा परिसरात झाडे-झुडपे जंगलाने परिसर व्यापला होता.

1648 ते 1672 पर्यंत राजगडावर हिंदवी स्वराज्याची पहिली राजधानी होती. या कालावधीत शिवरायांचे राजगडावर राजपरिवारासह वास्तव्य होते. शिवरायांचे थोरले पुत्र छत्रपती श्रीसंभाजी महाराज यांचे बालपण, धाकटे पुत्र छत्रपती राजाराम महाराज यांचा जन्म, शिवरायांच्या पत्नी सईबाई यांचे निधन, आग्राच्या कैदेतून सुखरूप आगमन आदी घटनांचा साक्षीदार म्हणून राजगड व शिवपट्टण परिसर उभा आहे. परकीयांच्या तसेच ऐतिहासिक कागदपत्रात शिवपट्टण स्थळाचा उल्लेख आहे. या ठिकाणी छत्रपती श्री शिवाजी महाराज वास्तव्यास आहेत.

तेथे त्यांना भेटण्यासाठी काही इंग्रज अधिकारी आले असल्याची पत्रे उपलब्ध आहेत. गेल्या वर्षीच्या उत्खननात शिवपट्टण येथील शिवरायांच्या सुबक व भव्य राजवाड्यासह व इतर बांधकामांच्या अवशेषांतून शिवरायांच्या राज्यकारभाराचे दर्शन जगाला झाले.
वाड्याची दर्जेदार उभारणी, स्वच्छतागृह, स्वयंपाकगृह, विटा, कौले आदी अवशेष सापडले आहेत. शिवरायांनी चलनात आणलेली शिवराई नाणी, बहामनी काळातील नाणीही येथे सापडली आहेत. उत्खननात सापडलेल्या वास्तूंच्या मूळ चौथर्‍यावर शिवकालीन बांधकाम आहे. या ठिकाणी पुन्हा उत्खनन करण्यात येणार आहे. त्यामुळे नव्याने ऐतिहासिक स्थळे, वास्तु, वस्तू साधने उजेडात येणार आहे. अशा प्रकारचा हा राज्यातील पहिलाच प्रकल्प असल्याने पुरातत्त्व खात्याने युध्दपातळीवर लक्ष केंद्रित
केले आहे. (समाप्त)

हेही वाचा

Back to top button