पिंपरी आग दुर्घटना : ‘त्या’ कारखान्याला नव्हते ‘फायर एनओसी’ | पुढारी

पिंपरी आग दुर्घटना : ‘त्या’ कारखान्याला नव्हते ‘फायर एनओसी’

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : वाढदिवसाच्या केकवर वापरल्या जाणार्‍या स्पार्कल कँडल बनविणार्‍या तळवडे- ज्योतिबानगर येथील कारखान्याला फायर एनओसी मिळाली नसल्याची बाब समोर आली आहे. हा परिसर रेडझोन क्षेत्रात असल्याने तेथे फायर एनओसी दिली जात नसल्याचे महापालिका अग्निशामक विभागाकडून शनिवारी (दि. 9) स्पष्ट करण्यात आले. तळवडेतील संबंधित कारखान्यात शुक्रवारी (दि. 8) लागलेल्या आगीत सहा महिलांचा होरपळून मृत्यू झाला.

तर, 10 जण जखमी झाले आहेत. या घटनेनंतर विविध प्रश्न उभे राहू लागले आहेत. हा कारखाना रेडझोन क्षेत्रात होता. रेडझोन हद्दीत बांधकामांना प्रतिबंध आहे, असे असतानाही येथे अनधिकृत बांधकामे व पत्राशेड उभारून त्यांची विक्री केली जात आहे. त्यामध्ये सर्वसामान्य नागरिकांची मात्र फसवणूक होत आहे.

उद्योगांना फायर एनओसी देताना कोणत्या बाबी तपासतात?

संबंधित उद्योगाने औद्योगिक परवाना घेतलेला असणे गरजेचे आहे. ज्या इमारतीत उद्योग केला जात आहे ती इमारत अधिकृत आहे का, हे पाहिले जाते. 15 मीटरपेक्षा कमी उंची असणार्‍या इमारती आणि 500 चौरस मीटरपेक्षा कमी क्षेत्रातील बांधकामाला कायद्याने फायर एनओसीची गरज नसते. तथापि, उद्योगांना व्यवसायासाठी अग्निशामक विभागाकडून व्यवसाय एनओसी मात्र घ्यावी लागते. ही एनओसी देण्यापूर्वी व्यवसायाच्या ठिकाणी आगीसारख्या दुर्घटनेपासून वाचण्यासाठी आवश्यक फायर एक्सटिंग्विशवर व अन्य अग्निशामक साधने बसविली आहेत का, हे तपासले जाते. व्यवसायासाठी दिली जाणारी एनओसी ही वर्षभराच्या कालावधीसाठी असते. जागामालकाने व्यवसायासाठी भाडेकराराने एखादी जागा दिली असल्यास भाडेकरुने व्यवसायासाठी अग्निशामक विभागाची एनओसी घेणे गरजेचे आहे.

अग्निशामक दलाकडून फिर्याद

कारखान्यात आगीच्या घडलेल्या दुर्घटनेबद्दल महापालिका अग्निशामक दलाकडून देहूरोड पोलिस ठाण्यात जागामालक आणि कंपनी मालक अशा दोघांविरोधात फिर्याद देण्यात आली आहे, अशी माहिती अग्निशामक विभागाचे प्रभारी सब-ऑफिसर अनिल डिंबळे यांनी दिली. डिंबळे म्हणाले की, संबंधित कारखाना हा रेडझोन क्षेत्रात येत असल्याने त्याला फायर एनओसी दिलेली नव्हती.

तळवडे क्षेत्रात लघुउद्योगांना रेडझोन क्षेत्रामुळे फायर एनओसी मिळत नसली तरी दुर्घटना घडलेल्या ठिकाणी आगीपासून सुरक्षेसाठी आवश्यक दक्षता घेणे गरजेचेच होते. त्यासाठी फायर एक्सटिंग्विशर व अन्य आग प्रतिबंधक साधने, बाहेर पडण्यासाठी पर्यायी मार्ग अशा सुविधा करायला हव्या होत्या. लघुउद्योगांनी आगीपासून सुरक्षेसाठी आवश्यक सर्व बाबी पाळल्या पाहिजे. त्याचप्रमाणे, आग प्रतिबंधक उपाययोजनांबाबत कामगारांना मॉक ड्रीलद्वारे प्रशिक्षण द्यायला हवे.

– संदीप बेलसरे, अध्यक्ष,पिंपरी-चिंचवड लघुउद्योग संघटना 

एकास अटक; तर तिघांंवर गुन्हा

तळवडे येथील ज्योतिबानगरमधील रेड झोन परिसरात शिवराज एन्टरप्रायझेस येथे ‘स्पार्कल’ मेणबत्ती तयार करणार्‍या कारखान्यात काम सुरू असताना शुक्रवारी (दि.8) अचानक भडका उडाल्याने झालेल्या स्फोटात सहा महिला कामगारांचा होरपळून मृत्यू झाला. याप्रकरणी देहुरोड पोलिसांनी एकाला अटक केली असून दोन महिलांसह तिघांवर गुन्हा दाखल केला आहे. नजीर अमिर शिकलगार (रा.मोहननगर, चिंचवड) असे अटक आरोपीचे नाव आहे, याबरोबर दोन महिला आरोपी व शरद सुतार यांच्यावर देहूरोड पोलिसांनी गुन्हा दाखल केला. पोलिस ठाण्यात अग्निशमन दलाचे अधिकारी बाळासाहेब विश्वनाथ वैद्य यांनी फिर्याद दिली आहे.

जखमींना आवश्यक ती मदत करा : गोर्‍हे

तळवडे एमआयडीसीमध्ये फायर कँडल कारखान्यातील आगीत सहा महिलांचा होरपळून मृत्यू झाला, तर आठ महिला जखमी झाल्या असून, त्यांच्यावर ससून रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या जखमींना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मदत केली आहे. पंतप्रधान कार्यालय आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेने आवश्यक ती मदत करावी, अशा सूचना विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोर्‍हे यांनी केल्या आहेत.

ससून रुग्णालयात उपचार घेत असलेल्या महिलांच्या वॉर्डला भेट दिल्यानंतर त्या माध्यमांशी बोलत होत्या. या घटनेतील मृत्यूची संख्या वाढत आहे. त्यांच्यावर योग्य उपचार व्हावेत, यासाठी बैठक घेऊन सूचना दिल्या आहेत. विशेष म्हणजे फायर कँडल कारखाना परवानगीशिवाय उभारण्यात आल्याची माहिती समोर आली असून, असे कसे होऊ शकते. दुर्घटनेत मृत्यू आणि जखमींच्या मुलांच्या भविष्याचा विचार करून त्यांचे पुनर्वसन करणार असल्याचे डॉ. गोर्‍हे यांनी सांगितले.

हेही वाचा

 

 

Back to top button