जळगाव ; पुढारी वृत्तसेवा जामनेर तालुक्यातील तरंगवाडी येथे मुलाचा वडिलांबरोबर शेतीच्या वाटणीवरून वाद झाला. या वादात मुलाने वडिलांच्या डोक्यात फावडे घालून खून केल्याची धक्कादायक घटना (शनिवारी) घडली. या घटनेनंतर वडिलांचा खून करणारा मुलगा तेथून फरार झाला. आपल्या वडिलांनी आजोबांचा खून केल्याचा प्रकार नातवाने बघितला. या प्रकरणी खून करणाऱ्या पित्या विरूद्ध नातवाने फिर्याद दिली आहे.
या विषयी अधिक माहिती अशी की, जामनेर तालुक्यातील शेदुर्णी येथील तरंगवाडी या शिवारामध्ये शेतकरी नाना बडगुजर (वय ८२) यांचे शेत आहे. ते शनिवारी नेहमीप्रमाणे आपल्या शेतात काम करीत होते. शनिवारी शेतामध्ये कपाशी वेचत होते. त्यावेळेस त्यांचा मुलगा संशयित कैलास नाना बडगुजर हा शेतात येऊन वडिलांसोबत वाटणीवरून वाद घालू लागला. यावेळी मृत नाना बडगुजर यांनी त्याला नकार दिला. संशयित आरोपी व मुलगा कैलास बडगुजर याने वडील नाना बडगुजर यांच्या डोक्यात भुसा भरण्याच्या फावड्याने जोरदार वार केला. त्याच ठिकाणी नाना बडगुजर हे कोसळले.
संशयित कैलास बडगुजर यांचा मुलगा विशाल बडगुजर व त्याची पत्नी शेतात काम करत होते. आजोबाच्या डोक्यात वडिलांनी वार केल्याचे बघताच ते त्या ठिकाणी धावत गेले.
नाना बडगुजर हे कोणती हलचाल करीत नसल्याने बघून संशयीत आरोपी कैलास बडगुजर यांने शेतातून पळ काढला. ही बातमी वाऱ्यासारखी शेतात व गावात पसरल्यावर अनेकांनी घटनास्थळी धाव घेतली. तर शेंदुर्णी दूर क्षेत्राचे पोलीस निरीक्षक दिलीप पाटील शशिकांत पाटील व इतर कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत मृत नाना बडगुजर यांचा मृतदेह ग्रामीण रुग्णालय व घटनास्थळी पंचनामा केला. आरोपीच्या शोधात पथके रवाना झालेली आहेत. संशयिताचा मुलगा विशाल कैलास बडगुजर (वय 33) याने दिलेल्या फिर्यादीवरून खुणाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. पुढील तपास उपनिरीक्षक दिलीप पाटील हे करीत आहेत.