पुणे : पुढारी वृत्तसेवा : शिक्षण हक्क कायद्यानुसार दिल्या जाणार्या 25 टक्के आरक्षित जागांवरील प्रवेशासाठी राबविल्या जाणार्या आरटीई ऑनलाईन प्रवेशप्रक्रियेच्या तयारीला राज्याच्या प्राथमिक शिक्षण विभागाने सुरुवात केली आहे. त्यामुळे आपल्या पाल्याचा आरटीई अंतर्गत प्रवेश व्हावा, यासाठी प्रयत्न करणार्या इच्छुक पालकांनासुध्दा आवश्यक कागदपत्र जमा करण्याची तयारी सुरू करावी लागणार आहे. आरटीई अंतर्गत सामाजिक व आर्थिकदृष्ट्या मागास घटकातील विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये 25 टक्के जागांवर प्रवेश दिला जातो. दर वर्षी त्यासाठी ऑनलाईन प्रवेशप्रक्रिया राबवली जाते. प्रवेशासाठी उपलब्ध जागांच्या तुलनेत सुमारे 3 ते 4 पट अर्ज येतात. त्यामुळे ऑनलाईन लॉटरी काढून विद्यार्थ्यांना प्रवेश दिले जातात.
राज्याचे प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी म्हणाले, की प्राथमिक शिक्षण विभागातर्फे डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात येत्या शैक्षणिक वर्षातील आरटीई प्रवेशाची प्राथमिक तयारी सुरू केली जाईल. राज्य सरकारला अधिवेशनानंतर प्रवेशप्रक्रियेत काही बदल आहे का किंवा जुन्याच पध्दतीने अंमलबजावणी करायची, यासंदर्भात विचारणा केली जाईल आणि त्यानंतर प्रवेशप्रक्रियेच्या अंमलबजावणीला सुरुवात केली जाणार आहे.
आरटीई प्रवेशासाठी शाळा नोंदणी करणे, ऑनलाईन यंत्रणेची तपासणी करणे, पालकांना आवश्यक दाखले काढून ठेवण्याचे आवाहन करणे, पालकांमध्ये प्रवेशासंदर्भात जागृती करणे आदींबाबत प्राथमिक तयारी केली जात आहे. दरम्यान, राज्याच्या शालेय शिक्षण विभागातर्फे आरटीई प्रवेशप्रक्रिया उशिरा सुरू केली जाते. त्यामुळे आरटीईचे विद्यार्थी इतर विद्यार्थ्यांच्या तुलनेत अभ्यासात मागे राहतात. त्यामुळे या वर्षी प्रवेशप्रक्रिया नियोजित कालावधीत पूर्ण करावी,अशी अपेक्षा पालकांकडून व्यक्त केली जात आहे.
हेही वाचा