धक्कादायक ! व्यावसायिक मित्राच्या मृत्यूसाठी स्मशानभूमीत अघोरी पूजा | पुढारी

धक्कादायक ! व्यावसायिक मित्राच्या मृत्यूसाठी स्मशानभूमीत अघोरी पूजा

उरुळी कांचन : पुढारी वृत्तसेवा :  व्यावसायिक मित्राचा मृत्यू होण्यासाठी स्मशानभूमीत अघोरी पूजा करून, त्याच्या कुटुंबाचा सर्वनाश व्हावा यासाठी मंत्राचे पठण करण्याचा धक्कादायक प्रकार सोरतापवाडी (ता. हवेली) येथे घडला. या प्रकरणी मित्राच्या पत्नीने लोणी काळभोर पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. याप्रकरणी अंधश्रद्धा निर्मूलन समितीने देखील कारवाई करण्याची मागणी केली आहे.
गणेश तात्यासाहेब चौधरी (रा. सोरतापवाडी, ता. हवेली) असे स्मशानभूमीत अघोरी पूजा घालणार्‍याचे नाव आहे. तर सुरभी अमोल मानमोडे – सुरवडे असे पोलिसांत तक्रार देणा-या महिलेचे नाव आहे.

संबंधित बातम्या :

गणेश चौधरी हा सावकार असून, त्याची तक्रारदार अमोल मानमोडे यांच्यासोबत व्यावसायिक भागीदारी आहे. काही दिवसांपासून व्यावसायिक कारणावरून दोघांमध्ये मतभेद झाले होते. यातून अमोल मानमोडे यांचा मृत्यू होऊन त्यांच्या कुटुंबाचा सर्वनाश व्हावा, यासाठी चौधरी याने गुरुवारी (दि. 7) रात्री स्मशानभूमीत वेगवेगळ्या अघोरी पूजा केल्या. तसेच त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावरून शेअर केला. हा प्रकार समजल्यानंतर गावकर्‍यांनी या घटनेची माहिती तातडीने तक्रारदाराला दिली. त्यानंतर सुरभी मानमोडे यांनी चौधरीविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली. या प्रकाराने परिसरात खळबळ उडाली आहे. अंनिसने याप्रकरणी आरोपीवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. लोणी काळभोर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक शशिकांत चव्हाण या प्रकरणाचा तपास करीत आहेत. दाखल तक्रारीनुसार कारवाई करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Back to top button