शासनाला जाग ! संकल्प इंजिनिअरिंग कंपनीला खंडणी मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल | पुढारी

शासनाला जाग ! संकल्प इंजिनिअरिंग कंपनीला खंडणी मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल

शिक्रापूर : पुढारी वृत्तसेवा : करंदी (ता. शिरूर) येथील संकल्प इंजिनिअरिंग ही कंपनी गुजरात येथे स्थलांतरित होणार या वृत्तानंतर महाराष्ट्र शासनाला खडबडून जाग आली आहे. गृह खाते व सरकार ॲक्शन मोडमध्ये आले आहे. या कंपनीला खंडणी मागितल्याप्रकरणी पहिला गुन्हा दाखल झाला असून शिरूर येथील मनसेचा पदाधिकारी असलेल्या सुशांत कुटे याच्यावर २५ लाख रुपये मागितल्याप्रकरणी खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार मंत्रालय पातळीवर वन विभागाच्या हद्दीतून जाणाऱ्या रस्त्याची परवानगी देण्याबाबत हालचाली सुरू झाल्या आहेत. दै. ‘पुढारी’ने कंपनी गुजरातला जाण्याबाबत व शेकडो कामगार बेरोजगार होण्याबाबत वृत्त प्रसिद्ध केले होते. या वृत्ताची प्रशासनाने दखल घेतली. खंडणी मागितल्याप्रकरणी संकल्प इंजिनीअरींगचे मानव संसाधन विभाग प्रमुख कपिल धनीलाल यादव यांनी फिर्याद दिली आहे.

याबाबत माहिती अशी की, १ वर्षापुर्वी कंपनीमधून कामावरून यादव हे घरी जात असताना एका इसमाने कंपनीच्या बाहेर थांबवून ‘माझे नाव सुशांत कुटे आहे. तुमच्या कंपनीमध्ये स्क्रॅपचे कॉन्ट्रॅक्ट मला द्या’ अशी मागणी केली. त्यावेळी स्क्रॅपचे कॉन्ट्रॅक्ट दुसरीकडे चालू असल्याने तुम्हाला देऊ शकत नाही असे यादव यांनी सांगितले. तेव्हा कुटे म्हणाला की, “तुम्ही मला जर कॉन्ट्रॅक्ट देणार नसाल, तर तुमच्या कंपनीकडुन मला दर महिन्याला काही रक्कम द्यावी लागेल.” त्यावेळी त्याला स्पष्ट शब्दात काय पाहिजे असे विचारले असता, तो म्हणाला की “माझे नाव तुम्हाला माहीत नाही. तुम्ही मला जर स्क्रॅपचे कॉन्ट्रॅक्ट अथवा दर महिन्याला दोन लाख रूपये दिले नाही, तर मी तुमची कंपनी बंद पाडु शकतो” अशी धमकी दिली.

यानंतर पुन्हा जानेवारी २०२३ मध्ये सुशांत कुटे याने कंपनीबाहेर भेटून मागणी केली. त्यावेळी देखील नकार दिल्याने जिवे मारण्याची धमकी दिली. तो गुंड प्रवृत्तीचा असल्याचे समजल्याने त्याचे विरोधात कोणाकडेही तकार केली नाही.

दरम्यान दि. १ डिसेंबर सुशांत कुटे याने वनविभागाकडे कंपनीची तकार करूनही काही झाले नाही, म्हणून तो वनविभाग कार्यालय, शिरूर येथे उपोषणाला बसला होता. कुटे याने यादव यांना उपोषणाच्या ठिकाणी बोलावून घेतले व मी आता उपोषणाला बसून तुमची कंपनीच बंद करतो. तुम्हाला जर हे मिटवायचे असेल तर २५ लाख रूपये मला द्या, मी लगेच उपोषण सोडतो अशी धमकी दिली. याबाबत शिक्रापूर पोलीस अधिक चौकशी करत आहे.

हेही वाचा :

Back to top button