

कुसेगाव : पुढारी वृत्तसेवा : पाटस (ता. दौंड) गावाच्या परिसरात औद्योगिकरण वाढले असल्याने परिसरात राहणार्या लोकांना प्रदूषणाचा सामना करावा लागत आहे. यामुळे नागरिक त्रस्त झाले असून, हे प्रदूषण कोण रोखणार? असा प्रश्न उपस्थित होत आहे. पाटस गाव परिसराच्या चारही बाजूंनी गुर्हाळ व्यवसाय फोफावला आहे. गुर्हाळघरांना जळण म्हणून सरसकट प्लास्टिक कचरा वापरू लागल्याने त्यातून निघणारा धूर वातावरणात जात असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. त्यातच पाटस गावच्या रेल्वे स्टेशन परिसरात असलेल्या सिमेंट कंपन्या दिवस-रात्र सुरू असल्याने यातील निघणारा धुरळा रात्रीच्या वेळी वातावरणात जाऊन जमिनीवर येऊन पडत असल्याने शेतात उभ्या असणार्या पिकांवर परिणाम होऊ लागला आहे.
संबंधित बातम्या :
यामुळे भविष्यात येथील जमीन नापीक होईल का? तसेच भविष्यात याचा मानवी जीवनावर परिणाम होईल का? अशी चिंता शेतकरी व परिसरातील नागरिकांना वाटू लागली आहे. सिमेंट कंपन्या, गुर्हाळे, कारखानदारी, केरकचरा यामुळे पाटस परिसरात वेगवेगळ्या प्रदूषणात वाढ झाली असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असताना प्रदूषण विभागाने याकडे बारकाईने लक्ष देणे गरजेचे आहे.
एमआयडीसीतील दुर्गंधीचा मोठा त्रास
कुरकुंभ एमआयडीसीतून मोठ्या प्रमाणात दुर्गंधी निर्माण होते. याचा कुबट वास वार्याबरोबर रोटी, हिंगणीगाडा व पाटसपर्यंत येऊ लागला आहे. याचादेखील परिमाण भविष्यात मानवी आरोग्यावर होणार हे निश्चित.