..तर चाकणकरांनी राजकारण सोडावे : संभाजी ब्रिगेडचे प्रदीप कणसे

..तर चाकणकरांनी राजकारण सोडावे : संभाजी ब्रिगेडचे प्रदीप कणसे
Published on
Updated on

पुणे : पुढारी वृत्तसेवा : राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांच्याबाबत सोशल मीडियावर अश्लील पोस्ट किंवा कमेंट केलेली नसतानाही आपली नाहक सामाजिक बदनामी केली आहे. चाकणकर यांनी पोलिसांवर दबाव टाकून पदाचा गैरवापर केल्याचा आणि चुकीची माहिती दिल्याचा आरोप संभाजी ब्रिगेडचे प्रदीप कणसे यांनी पत्रकार परिषदेत केला. वैचारिक टीका सहन होत नसल्यास चाकणकर यांनी राजकारण सोडून द्यावे, असेही कणसे म्हणाले.

रूपाली चाकणकर यांनी दिवाळीत पाडव्याच्या शुभेच्छा देताना फेसबुकवर बळीराजाच्या डोक्यावर वामन पाय देत असल्याचे चित्र शेअर केले होते. त्यावर व्यथित होत कणसे यांनी 14 नोव्हेंबर रोजी चाकणकर यांची पोस्ट शेअर करत 'यांचे सोशल मीडिया अकाऊंट कोण हाताळते? हे चित्र काय दर्शवते याचे आकलन, अभ्यास, दृष्टी, समज यांना नाही आहे काय?' अशा शब्दांत निषेध केला. कणसे यांना सायबर पोलिसांकडून 27 नोव्हेंबर रोजी नोटीस मिळाली आणि 5 डिसेंबर रोजी चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितले.

आईला डॉक्टरकडे घेऊन जायचे असल्याने आपण 6 डिसेंबर रोजी उपस्थित राहत नसल्याचे कणसे यांनी सांगितले. मात्र, त्यापूर्वीच चाकणकर यांच्यावर अश्लील पोस्ट लिहिल्याप्रकरणी पोलिसांनी कणसे यांना ताब्यात घेतल्याचे वृत्त प्रसारित झाले. चाकणकर यांचे बंधू संतोष बोराटे यांच्या फिर्यादीवरून 19 ऑक्टोबर रोजी दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यामधील चौकशीसाठी प्रदीप कणसे यांना चौकशीसाठी बोलावण्यात आले. चाकणकर यांच्या पोस्टचा निषेध 14 नोव्हेंबर रोजी केलेला असताना राजकीय सूडबुध्दीपोटी 19 ऑक्टोबरच्या गुन्ह्यामध्ये आपल्याला अकारण गोवण्यात आले.

वैयक्तिक आकसापोटी आपल्याला जाणीवपूर्वक बदनाम केले जात आहे. चाकणकर माझ्या लोकशाही स्वातंत्र्यावर घाला घालत आहेत. महिलांचे प्रश्न सोडवण्याऐवजी स्वत:च महिला असल्याचे व्हिक्टिम कार्ड खेळत आहेत. त्या राजकीयदृष्ट्या अपरिपक्व असून, चळवळीतील कार्यकर्त्यांना टार्गेट करून खोट्या गुन्ह्यामध्ये अडकवत असल्याचा आरोप कणसे यांनी केला आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news