11 महिन्यांत 4 लाखांवर पासपोर्ट केले वितरित | पुढारी

11 महिन्यांत 4 लाखांवर पासपोर्ट केले वितरित

पुणे : पुढारी वृत्तसेवा : पुणे येथील प्रादेशिक पारपत्र (पासपोर्ट ) कार्यालयाने अवघ्या 11 महिन्यांत तब्बल 4 लाख 24 हजार 349 इतक्या पासपोर्टचे वितरण करून आजवरचे सर्व विक्रम मोडीत काढले आहेत. या कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांनी केलेल्या जनजागृतीमुळेच हे शक्य झाले आहे. पुणे पासपोर्ट कार्यालयाचे विभागीय अधिकारी डॉ. अर्जुन देवरे यांनी त्यांच्या टीमसह प्रचंड मेहनत करून जनसामान्यांत पासपोर्ट जागृती मोहीम हाती घेतली होती. गेले वर्षभर त्यांनी सामाजिक प्रसारमाध्यमांसह वर्तमानपत्रांतून याविषयी मोठ्या प्रमाणावर जनजागृती केली.
लोकांना पासपोर्टचे काम अतिशय अवघड अन् क्लिष्ट वाटत होते. ते किती सोपे आहे हेच या अभियानात पटवून देण्यात आले. त्यामुळे जानेवारी ते नोव्हेंबर 2023 या कालावधीत 4 लाखांहून अधिक पासपोर्ट जारी करता आले. मागील वर्षाच्या तुलनेत याच कालावधीत 1 लाख अधिक पासपोर्ट जारी करण्यात आले आहेत. जानेवारी ते नोव्हेंबर 2021 दरम्यान 2 लाख 128 पासपोर्ट जारी करण्यात आले. तर  जानेवारी ते नोव्हेंबर 2022 या कालावधीत ही संख्या 1 लाखांहून अधिक वाढली. या कालावधीत 3 लाख 9 हजार 478 पासपोर्ट जारी करण्यात आले. जानेवारी ते नोव्हेंबर 2023 पर्यंत तब्बल 4 लाख 24 हजार 349 पासपोर्ट जारी करण्यात आले, हा आजवरचा सर्वात मोठा विक्रम आहे.
गेल्या वर्षी संपूर्ण 2022 मध्ये, पुणे पासपोर्ट कार्यालयाने 2021 च्या तुलनेत 1.13 लाख अधिक पासपोर्ट जारी केले. हीच गती सुरू ठेवत, सप्टेंबर 2023 पर्यंतच पासपोर्ट कार्यालयाने संपूर्ण 2022 मध्ये जारी केलेल्या पासपोर्टपेक्षा जास्त पासपोर्ट जारी केले. पासपोर्ट अधिकारी डॉ. देवरे यांनी पासपोर्ट अर्जदारांना पासपोर्ट जारी करण्याच्या प्रक्रियेबद्दल जागरूक करण्यावर भर दिला आहे. पासपोर्ट जारी करणे आणि प्रक्रियेची संपूर्ण माहिती अधिकृत पासपोर्ट वेबसाइटवर उपलब्ध आहे.
तरीही, अशी अनेक प्रकरणे घडतात जिथे, सर्व माहिती सहज उपलब्ध असूनही, लोक पासपोर्ट जारी करण्यासाठी अनेक आवश्यक कागदपत्रे आणण्यात अपयशी ठरतात. अशाप्रकारे पासपोर्ट अर्ज, जारी करणे आणि बरेच बारकावे त्यांनी यात अर्जदारांना दिले. राष्ट्रीय कॉल सेंटरच्या (1800-258-1800 या क्रमांकावर) किंवा अधिकृत पासपोर्ट वेबसाइटला भेट देऊन नेमके काय करावे याविषयी मोठी जागरुकता करण्यात येत आहे.
या आधीही आम्ही आमचे काम करीत होतोच. पण, सामान्य नागरिकांना पासपोर्टचे काम म्हणजे अत्यंत अवघड अन क्लिष्ट वाटत होते. आमच्या सर्व टीमने पासपोर्ट कसा काढावा, त्यासाठी लागणारी कागदपत्रे, ऑनलाइन अर्ज कसा भरावा याबाबत समाजमाध्यमांद्वारे  जनजागृती केली, त्याचे हे फलित आहे. आम्ही अवघ्या 11 महिन्यांतच 4 लाखांपेक्षा जास्त पासपोर्ट वितरीत करू शकलो, हा मोठा विक्रम आहे.
– डॉ. अर्जुन देवरे, विभागीय पारपत्र अधिकारी, पुणे
हेही वाचा

Back to top button