Pune News : ठेकेदारांच्या नव्याकोर्‍या ’पीएमपी’ला घरघर!

Pune News : ठेकेदारांच्या नव्याकोर्‍या ’पीएमपी’ला घरघर!
Published on
Updated on

पुणे : पुणेकरांची जीवनवाहिनी असलेली पीएमपी प्रवाशांसाठीच्च 'असून अडचण, नसून खोळंबा' ठरत आहे. एकाच महिन्यात ठेकेदाराच्या तब्बल 776 बस रस्त्यात अचानक बंद पडल्या असून, यामुळे प्रवाशांना पर्यायी वाहनांतून इच्छितस्थळ गाठावे लागत आहे. परिणामी, वेळ आणि पैसा खर्च करून फुकटचा मनस्ताप प्रवाशांना सहन करावा लागत आहे. ठेकेदाराच्या नव्याकोर्‍या बस बंद पडत असतानाही पीएमपी प्रशासनाकडून कोणतीही ठोस उपाययोजना केली जात नाही. ठेकेदारांच्या बस सातत्याने रस्त्यांमध्ये बंद पडत आहेत. यापूर्वीही दै. 'पुढारी' ने वृत्त प्रसिध्द करून पीएमपी प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिले होते. मात्र, 'पालथ्या घड्यावर पाणीच' या म्हणीप्रमाणे पीएमपी प्रशासनाची अवस्था आहे.

रस्त्यात बसगाड्या पडतात बंद

नोव्हेंबर 2023 या एकाच महिन्यात ठेकेदारांच्या सीएनजी बससह नव्याने दाखल झालेल्या इलेक्ट्रिक बस अशा एकूण 776 बसगाड्या प्रवासी सेवा पुरविताना रस्त्यातच बंद पडल्या आहेत. यामुळे पुणेकर प्रवाशांना चांगलाच मनस्ताप सहन करावा लागला आहे.

नियोजनाची ऐशीतैशी

ठेकेदारांच्या बसगाड्यांचे ब्रेक डाऊन रोखण्यासाठी पीएमपी प्रशासन आपल्याकडील इंजिनिअरच्या पथकामार्फत ठेकेदारांच्या देखभाल-दुरुस्ती विभागाची दरमहिन्याला पाहणी करणार होते. याचे नियोजन देखील प्रशासनाकडून करण्यात आले होते. मात्र, इतक्या बस रस्त्यात बंद पडल्यामुळे नक्की ठेकेदारांच्या देखभाल-दुरुस्ती विभागाची पहाणी होते की नाही, असा प्रश्न सध्या उपस्थित झाला आहे.

ठेकेदारांना याबाबत वेळोवेळी सूचना केल्या जात आहेत. त्यांच्यावर दंडात्मक कारवाईसुध्दा केली जात आहे. दिवसाला गाडी मार्गावर न गेल्यास 10 हजार रुपयांपर्यंत दंड केला जात आहे. तसेच, सातत्याने जर एखादी गाडी बंद पडत असेल तर तिला ताफ्यातून बाद करण्याच्या कडक सूचना ठेकेदारांना देण्यात आल्या आहेत.

– नितीन नार्वेकर, सहव्यवस्थापकीय संचालक, पीएमपीएमएल

मला कामानिमित्त बसने शहरात फिरावे लागते. अनेकदा मला रस्त्यातच बस बंद पडल्याचे दिसते. कधी-कधी तर मी बसलेली बसच रस्त्यात बंद पडते. त्या वेळी भररस्त्यात उतरून पर्यायी वाहन शोधण्यासाठी कसरत करावी लागते. दुसरी बस मिळाली तर ठिक, नाहीतर रिक्षाला पैसे देऊन प्रवास करावा लागतो.

– सिध्देश वाघ, प्रवासी

हेही वाचा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news