तलाठी भरती परीक्षा : चुकलेल्या प्रश्नांना गुण मिळणार | पुढारी

तलाठी भरती परीक्षा : चुकलेल्या प्रश्नांना गुण मिळणार

पुणे : पुढारी वृत्तसेवा : राज्यातील तलाठी भरतीसाठी घेण्यात आलेल्या परीक्षेतील चुकलेल्या प्रश्नांच्या उत्तरांना सरसकट गुण देण्यात येणार आहेत, अशी माहिती भूमिअभिलेख विभागातील अधिकार्‍यांनी दिली. राज्यात मागील चार महिन्यांपूर्वी झालेल्या तलाठी भरती परीक्षेसाठी साडेअकरा लाखांपेक्षा जास्त उमेदवारांनी अर्ज भरले होते. छाननीअंती 4466 जागांसाठी दहा लाख 41 हजार 713 असे विक्रमी अर्ज प्राप्त झाले होते. त्यापैकी प्रत्यक्षात आठ लाख 64 हजार 960 उमेदवारांनी परीक्षा दिली.

मोठ्या प्रमाणात अर्ज आल्याने ही परीक्षा तीन टप्प्यांत आणि दिवसातील तीन सत्रांत घेण्याचे निश्चित करण्यात आले होते. त्यानुसार 17 ते 22 ऑगस्ट पहिला टप्पा, 26 ऑगस्ट ते 2 सप्टेंबर दुसरा टप्पा आणि 4 ते 14 सप्टेंबर असे तीन टप्पे करण्यात आले होते. एकूण परीक्षेची 57 सत्रे झाली. या सत्रांत विविध प्रश्नपत्रिकांमधून साडेपाच हजारांपेक्षा अधिक प्रश्न विचारण्यात आले होते. उमेदवारांकडून हरकती, आक्षेप नोंदविण्यात आले असून, त्यावर डिसेंबरच्या दुसर्‍या आठवड्यापर्यंत निराकरण करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. परीक्षेतील प्रश्न आणि त्यावरील उत्तराबाबत विभागाकडे राज्यभरातून 16 हजार 205 आक्षेपांचे अर्ज नोंदविले होते. त्यामधील 9 हजार 72 आक्षेप शासनाने मान्य केले.

तर, अर्जाच्या छाननीनंतर 2 हजार 831 आक्षेप अंतिम करण्यात आले. शासनाने टी.सी.एस. या संस्थेच्या माध्यमातून राज्यभरात परीक्षेचे आयोजन केले होते. या संस्थेने सुमारे 5 हजार 700 च्या आसपास परीक्षेसाठी प्रश्न विचारले होते. विचारण्यात आलेल्या प्रश्नांना उत्तरासाठी चार पर्याय देण्यात आले होते. या चार पर्यायांपैकी उत्तरासाठी एक पर्याय अंतिम करण्यात आला होता. असे असले तरी परीक्षेत विचारण्यात आलेल्या एकूण प्रश्नांपैकी सुमारे 146 प्रश्नाबाबाबत दुरुस्ती करावी लागलेली आहे. त्यामधूनही 32 प्रश्नांचे उत्तर सुचित चुकीचे पर्याय दिले असल्याचे मान्य केले. मात्र, त्यामधूनही काही उमेदवारांनी पर्यायामधील उत्तर बरोबर दिले असल्यास त्यास गुण दिले जाणार आहेत.

राज्य शासनाने घेतलेल्या तलाठी भरती परीक्षेतील चुकलेल्या प्रश्नांना गुण दिले जाणार आहेत.

– सरिता नरके, अप्पर जमाबंदी आयुक्त, भूमिअभिलेख विभाग, पुणे

हेही वाचा

Back to top button