मोशीतील क्रीडांगण घोडेस्वारांचे की खेळाडूंचे? | पुढारी

मोशीतील क्रीडांगण घोडेस्वारांचे की खेळाडूंचे?

मोशी : पुढारी वृत्तसेवा : पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील मोशी येथील रिव्हर रेसिडेन्सी सोसायटीजवळील आरक्षण क्रमांक 1/137 या ठिकाणी लहान मुलांच्या खेळाच्या मैदानाचे आरक्षण आहे; परंतु गेल्या काही दिवसापांसून सर्वपक्षीय राजकारण या खेळाच्या मैदानावरून ढवळून निघाले आहे. नागरिकांना व्यायाम व खेळासाठी मैदान हवे असून, त्या ठिकाणी हॉर्स रायडिंगचे प्रशिक्षण केंद्र होणार असल्याने नागरिकांमध्ये नाराजी आहे. परिणामी, मैदानात घोडे धावणार की, नागरिक व्यायाम करताना दिसणार अशी द्विधा परिस्थिती काही राजकीय प्रतिनिधीसह स्थानिक नागरिकांसमोर निर्माण झाली आहे.

असे असेल घोडेस्वारी प्रशिक्षण केंद्र

पुणे जिल्ह्यातील खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी पिंपरी-चिंचवडमधील 100 गुंठे जागेत 60 टक्के इतर खेळाडू व स्थानिक 40 टक्के खेळाडूंना प्राधान्य दिले जाणार आहे. शहरात हे उपशहरी घोडेस्वारी केंद्र म्हणून ओळखले जाणार आहे. मुलांना घोडेस्वारीचे प्रशिक्षण देऊन राष्ट्रीय आशियाई अजिंक्य स्पर्धेत सहभागी होता येणार आहे. तसेच, 2028 व 2032 मध्ये खेळाडूंना ऑलिंपिकमध्ये सहभागी होता येणार आहे. या ठिकाणी घोड्यांच्या देखभालीसाठीच्या सर्व सुविधा उपलब्ध असणार आहेत. थरोब्रेड जातीची हे घोडे असून अतिशय चपळ आहेत.

असे असेल मैदान

पाण्याचे कुंड, अश्वांसाठी जागा, फिरते गवताळ मैदान क्षेत्र, पाण्याची सोय, सुरक्षित खाद्यक्षेत्र, ग्रुमिंग स्टॉल, तपासणी क्षेत्र, स्वागत क्षेत्र, बसण्याची जागा, माउंटिंग ब्लॉक्स.

पिंपरी – चिंचवड महापालिका हद्दीतील मोशी येथील क्रीडांगण असलेल्या भागात 10 ते 15 हजार फ्लॅट आहेत. या प्रभागात क्रीडांगणासाठी आरक्षण होते. खरी गरज ही मैदानाची आहे. हॉर्स रायडिंगची या ठिकाणी गरजच नाही. आयुक्तांनी निर्णय मागे घेऊन त्वरित हे मैदान नागरिकांना उपलब्ध करून द्यावे. या ठिकाणी खेळाडूदेखील येतात. याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत आमची चर्चा झाली आहे. यावर निर्णय घेण्याचे त्यांनी आश्वासन दिले आहे. सर्वपक्षीयांचा यासाठी विरोध आहे. हॉर्स रायडिंग हे मोफत नसून पैसे देऊन त्या ठिकाणी प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

– वसंत बोराटे, सामाजिक कार्यकर्ते

या भागात 50 हजार नागरिक राहतात. हे क्रीडांगण कोणत्याही संस्थेला न देता नागरिकांसाठी खुले करावे. येथे नागरिक व्यायामासाठी येतात. खेळाडू सराव करतात. नेमून दिलेल्या कोणत्याही संस्थेला आमचा विरोध नाही. तर, मंजूर आरक्षण मैदान नागरिकांना मिळावे, यासाठी आमचे उपोषण सुरू आहे.

– रूपाली आल्हाट, उपशहर संघटिका, पिंपरी-चिंचवड, शिवसेना

हेही वाचा

Back to top button