

पिंपरी : शेजारी राहणार्या तरुणाने दारूच्या नशेत झोपलेल्या सुरक्षारक्षकाचा लोखंडी रॉडने वार करून खून केला. त्यानंतर लगेचच अंघोळ करून कपडे बदलले; तसेच पोलिसांना सुगावा लागू नये, यासाठी रक्त लागलेले कपडे उसाच्या शेतात टाकून दिले. गुन्ह्यात वापरलेला लोखंडी रॉडही लपवून ठेवला. घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांसमोर तरुणाने आपल्याला काहीच माहिती नसल्याचा आव आणला. दरम्यान, एका चाणाक्ष पोलिस अधिकार्याची नजर त्याच्या केसांकडे गेली. नुकतेच तेल लावल्याने त्याचे केस चमकत होते.
संशय बळावल्याने दोरीवर टाकलेल्या अंडरवेअरला अधिकार्याने हात लावला असता अंडर वेअरदेखील ओली होती. त्यावरून पोलिसांनी चौकशी सुरू केली. तरुणाला अवेळी अंघोळ करण्याचे कारण काय? अंघोळीच्या आधी घातलेले शर्ट-पॅन्ट कुठे आहेत, असे पोलिसांनी विचारले. सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे देणारा तरुण काही मिनिटांतच पोलिसांचा 'खाक्या' पाहून घडाघडा बोलू लागला. केवळ चमकणार्या केसांमुळे उलगडा झालेल्या या गुन्ह्याची आजही सर्वत्र चर्चा आहे.
मराठवाड्यातील बीड येथून हातावर पोट असलेले एक कुटुंब उदरनिर्वाहासाठी हिंजवडी येथे आले होते. मुलाबाळांची गैरसोय नको म्हणून त्यांनी मुलांना शिक्षणासाठी नातेवाइकांकडे ठेवले होते. हिंजवडीत आल्यानंतर त्यांनी एका चाळीत खोली घेतली. घरातील कर्ता पुरुष असलेल्या पतीला दारूचे व्यसन होते. त्यामुळे त्याला कामावर कोणी घेत नव्हते. शेवटी एका बांधकाम साईटवर सुरक्षारक्षक म्हणून काम मिळाले. पत्नीनेही धुणी- भांड्याची कामे सुरू केली. चाळीत या कुटुंबासह आणखी एक कुटुंब वास्तव्यास होते. सर्वांचीच आर्थिक परिस्थिती जेमतेम होती.
या चाळीतील दुसरे दाम्पत्य त्यांच्या दोन मुलांसह काही वर्षांपासून या चाळीत वास्तव्यास होते. या कुटुंबातील मोठा मुलगा उच्चशिक्षित होता. तो खासगी नोकरीला होता. तर, 21 वर्षीय लहान मुलगा मजुरी करीत होता. या दोन्ही कुटुंबांमध्ये पाण्यावरून सतत भांडण व्हायचे. त्यातून मद्यपी सुरक्षारक्षकाने दमबाजी केली. त्यामुळे मजुरी करणार्या 21 वर्षीय तरुणाला राग आला. शेवटी सुरक्षारक्षकाचा काटा काढायचा, असे त्याने ठरवले.
घटनास्थळी गेल्यानंतर काहीही धागा सापडत नव्हता. परिसरातील सीसीटीव्ही तपासले त्यामध्येही काही मिळत नव्हते. शेजार्यांकडे चौकशी केली. मात्र, त्यांनाही काहीही माहिती नव्हते. दरम्यान, आरोपीच्या तेलामुळे चमकणार्या केसांवर नजर गेली. आणखी पाहणी केली असता मोरीत साबणातून पाणी टपकत असल्याने संशय बळावला. त्यामुळे बाजूला दोरीवर टाकली अंडरवेअर तपासली. अंडरवेअर ओली असल्याने आरोपीला सायंकाळी अंघोळ करण्याचे कारण विचारले. समाधानकारक उत्तरे न मिळाल्याने संशय बळावला. शेवटी आरोपीने गुन्हा कबूल केला.
– महेंद्र गाढवे, उपनिरीक्षक, पिंपरी-चिंचवड.
हेही वाचा