Pimpri News : मॅगी पॉईंट, सहारा पुलावरील दुकाने होणार बंद | पुढारी

Pimpri News : मॅगी पॉईंट, सहारा पुलावरील दुकाने होणार बंद

लोणावळा : पुढारी वृत्तसेवा : लोणावळा शहरातील जुन्या पुणे-मुंबई महामार्गालगतच्या व सहारा पुलावरील अनधिकृत टपर्‍या, खाद्य पदार्थाची विक्री करणारे टेम्पो, स्टॉल व दुकानधारकांवर लवकरच कारवाई करीत ही ठिकाणे बंद करण्यात येणार असल्याची माहिती लोणावळा उपविभागीय पोलिस अधिकारी आयपीएस सत्यसाई कार्तिक यांनी दिली आहे. यासंदर्भात त्यांनी पोलिस दलाकडून रस्ते विकास महामंडळ अर्थात एमएसआरडीसी आणि लोणावळा नगर परिषदेला सूचना देणारे पत्र देण्यात आल्याचेही सत्यसाई कार्तिक यांनी सांगितले. लोणावळा शहर हे पर्यटनस्थळ असल्याने दर शनिवारी व रविवारी तसेच सुटीच्या दिवशी मोठ्या प्रमाणात पर्यटक तसेच व्हीआयपी व्यक्ती देशभरातून तसेच विदेशातून पर्यटक येथे येत असतात. त्यामुळे वाहतुकीची कोंडी होऊन वाहतूक नियमन करावे लागते. या वाहतूक कोंडीचा पर्यटकांना तसेच सर्वसामान्य जनतेला नाहक त्रास सहन करावा लागतो.

भरधाव वाहनांमुळे अपघात

  •  मॅगी पॉईंट या ठिकाणी लोणावळा बाजूकडून मुंबईकडे जाणारा रस्ता हा उताराचा असल्याने याठिकाणी वाहने भरधाव येत असतात. त्यातच याठिकाणी येणारे जाणारे वाहनचालक हे रोडच्या दुतर्फा आपली गाडी उभी करून मॅगी पॉईंट येथे चहापान व खाद्यपदार्थ खाण्यासाठी जात असतात. त्यामुळे येथे अपघाताचे प्रमाण वाढले असल्याचे आईपीएस सत्यसाई कार्तिक यांनी सांगितले. याशिवाय सहारा पुलावर लागणार्‍या अनधिकृत हातगाड्या व फूड ट्रकमुळे याठिकाणी वाहतूक कोंडी सह अनेक बेकायदा प्रकार वाढीस लागले आहे.

अधिकार्‍यांकडे पत्रव्यवहार

  •  त्यापार्श्वभूमीवर शहरातील राष्ट्रीय महामार्ग क्र. 48 महामार्गाकडेला असलेले मॅगी टपर्‍या पूर्णपणे बंद होण्याकरिता व सहारा ब्रीजवर असलेले मॅगी विकीचे टेम्पो हातगाडे तसेच टपरी या पूर्णपणे बंद होण्याकरिता लोणावळा विभागाचे उपविभागीय पोलिस अधिकारी आईपीएस सत्यसाई कार्तिक यांनी कार्यकारी अभियंता, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ पुणे व मुख्याधिकारी लोणावळा नगर परिषद लोणावळा यांचेशी पत्रव्यवहार केला आहे.

वाहतूक कोंडीत वाढ

राष्ट्रीय महामार्ग क. 48 मुंबई ते पुणे या महामार्गालगतच्या लोणावळ्यातील मॅगी पॉईंट येथे थांबणार्‍या वाहनांमुळे त्या वाहतूक कोंडीत वाढ होत असते. सोबतच याठिकाणी बेकायदा रात्रभर सुरू राहणार्‍या अनधिकृत स्नॅक्स सेंटर व टपर्‍यांवर छोट्यामोठ्या गुन्ह्याच्या घटना अनेकदा घडल्या आहेत. याशिवाय या अनधिकृत व्यवसाय करणार्‍यांमध्ये वर्चस्वाची स्पर्धा निर्माण होऊन त्याचे आपापसांत हाणामारीमध्ये रुपांतर झालेले असून त्यावरुन लोणावळा शहर पोलिस स्टेशनमध्ये गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल झाले असल्याचे आईपीएस सत्यसाई कार्तिक यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

हेही वाचा

Back to top button