Pune : विद्युत मोटार, केबल चोरणारे अल्पवयीन पोलिसांच्या ताब्यात | पुढारी

Pune : विद्युत मोटार, केबल चोरणारे अल्पवयीन पोलिसांच्या ताब्यात

मंचर : पुढारी वृत्तसेवा :  लाखनगाव (ता. आंबेगाव) येथील शेतकर्‍यांच्या विद्युत मोटारी व तांब्याची केबल अज्ञात चोरट्याने पळवून नेली होती. या चोरीचा छडा लावण्यात पारगाव पोलिसांना यश आले असून, पोलिसांनी दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेत त्यांच्याकडून तीन मोटर पंप, दोन मोटर पंपांची वायर व गुन्ह्यात वापरलेली इलेक्ट्रिक स्कूटी जप्त केली आहे. लाखनगाव येथील दळेवस्ती येथील शेतकरी संदीप तुकाराम दळे यांची 9 हजार रुपये कंपनीची एचपी पाण्यातील मोटर व 1 हजार रुपये किमतीची तांब्याची केबल असा 10 हजार रुपयांचा ऐवज चोरी गेला होता. त्यांनी पारगाव पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.

याबाबत पारगावचे सहायक पोलिस निरीक्षक लहू थाटे यांनी हवालदार अजित मडके, शांताराम सांगडे, पोलिस अंमलदार संजय साळवे व मंगेश अभंग यांचे पथक नेमले होते. पारगाव पोलिस या गुन्ह्याचा तपास करीत असताना त्यांना माहिती मिळाली की, चिचगाईमळा पारगाव येथे दोन व्यक्ती मोटारसायकलवर केबल घेऊन फिरत आहेत. ते पंपाची वायर विक्रीसाठी घेऊन आले आहेत. पोलिस तेथे पोहचताच दोघे स्कूटी गाडी (एमएच 14 केई 7038) यावर बसले होते. स्कूटीवर काळ्या रंगाची केबल पोलिसांना दिसली.

पोलिसांनी त्यांना मोटारसायकलसह पोलिस ठाणे येथे आणून विचारपूस केली असता, त्यांनी ही केबल लाखणगाव येथे चोरी केली असून. चोरी केलेले मोटारपंप व केबल ही बेल्हे (ता. जुन्नर) येथे राहणारा विशाल अर्जुन खोमणे यास विकल्याचे सांगितले. पोलिसांनी दोघांनाही घेऊन बेल्हे येथे विशाल खोमणे याच्याकडे गेले असता, त्याने चोरीचा माल विकत घेतल्याचे कबूल करून तो माल घरातून काढून दिला. पोलिसांनी एकूण 3 मोटार पंप व 2 मोटार पंपाची वायर व गुन्ह्यात वापरलेली इलेक्ट्रिक स्कूटी असा मुद्देमाल हस्तगत केला आहे. या अल्पवयीन मुलावर पारगाव पोलिस ठाण्यात यापूर्वी तीन गुन्हे दाखल आहेत.

हेही वाचा :

Back to top button