Pimpri News : ठेकेदारी पद्धतीने क्रीडाशिक्षक भरतीला विरोध | पुढारी

Pimpri News : ठेकेदारी पद्धतीने क्रीडाशिक्षक भरतीला विरोध

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : पिंपरी चिंचवड महापालिका शिक्षण विभागाच्या वतीने शाळांमध्ये 32 क्रीडा शिक्षक ठेकेदारी पद्धतीने एका संस्थेच्या माध्यमातून भरले जाणार आहेत. शिक्षणासारख्या पवित्र कार्यात ठेकेदारी पद्धतीने शिक्षक नेमताना आयुक्तपददेखील ठेकेदारी पद्धतीने भरावे, अशी मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे. याबाबत सामाजिक कार्यकर्ते राहुल कोल्हटकर यांनी निवेदनात म्हटले आहे की, क्रीडाशिक्षक भरतीला आमचा विरोध नाही; परंतु क्रीडाशिक्षक मानधन तत्त्वावर भरण्याऐवजी ठेकेदारी पद्धतीचा अवलंब करणे चुकीचे आहे.

यासाठी शिक्षण विभागाच्या वतीने 1 कोटी 10 लाख 88 हजार रुपयांची निविदा काढण्यात आली. त्या निविदा प्रक्रियेत 3 संस्था यांनी सहभाग घेतला. त्यापैकी 2 संस्था पात्र ठरल्या, तर मे. किंडर स्पोर्ट्स यांची 5 टक्के जादा दर असलेली 1 कोटी 16 लाख 42 हजार 400 रुपयांची निविदा लघुत्तम दराची ठरवून त्यांना काम देण्याचा निर्णय मनपा प्रशासनाच्या वतीने घेण्यात आला. पालिका शाळांमध्ये यापूर्वी मानधन तत्त्वावर शिक्षक भरती केली जात होती, पण ठेकेदार पद्धतीने पैसे कमविण्याचा नवा पायंडा महापालिका शिक्षण विभागात पडला जात असल्याने करदात्या नागरिकाच्या मनात या प्रकाराबाबत शंका निर्माण होत आहे.

महापालिकेमध्ये वेळोवेळी शिक्षकांची रिक्त पदे मानधन तत्त्वावर भरली गेली आहेत. कार्यरत असणारे हे शिक्षक उत्कृष्ट कामगिरी करत आहे, असे शिक्षण विभाग यांचे म्हणणे आहे. मागील वेळी मानधन तत्त्वावर भरती करण्यात आली, मग असे असताना या वेळी क्रीडाशिक्षक भरती करताना ठेकेदारी पद्धतीचा अवलंब का केला गेला? व नेमका ठेकेदारी पद्धतीचा फायदा कोणाला होणार आणि शिक्षणासारख्या पवित्र कार्यात अशा चुकीच्या पद्धतीचा शिरकाव पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त शेखर सिंह का करत आहे?, असा प्रश्न निर्माण होत असल्याने, मुख्यमंत्री यांना विनंती आहे की, कंत्राटी पध्दतीने शिक्षक भरती करणार्‍या पिंपरी चिंचवड महापालिकेचे आयुक्तपदसुद्धा कंत्राटी पद्धतीने भरावे, असे आदेश लवकरच शासनाच्या वतीने पारित करावेत, असे निवेदनात म्हटले आहे.

हेही वाचा

Back to top button