राज्यातील प्राणिसंग्रहालयांत 200हून अधिक प्राण्यांचे मृत्यू!

राज्यातील प्राणिसंग्रहालयांत 200हून अधिक प्राण्यांचे मृत्यू!
Published on
Updated on

प्राणिसंग्रहालयात (zoo) प्राणी सुरक्षित राहतात का, असा प्रश्न प्राणीप्रेमींसह सामान्यांना कायमच पडलेला असतो. मात्र, असे होते की नाही, याची धक्कादायक माहिती केंद्रीय प्राणी संग्रहालय प्राधिकरणाला (सेंट्रल झू अ‍ॅथॉरिटी) सादर केलेल्या वार्षिक अहवालात समोर आली आहे. या अहवालानुसार, 2019-20 मध्ये राज्यातील सर्व प्राणिसंग्रहालयांमध्ये विविध आजारांनी 200 च्या घरात प्राण्यांचे मृत्यू झाले आहेत. यात चालू वर्षातील आकडेवारी (2020-21) येणे अजून बाकी असल्याने हा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे. देशात 513, तर महाराष्ट्रात 56 प्राणी संग्रहालये आहेत.

या सर्वांचे कामकाज केंद्रीय प्राणिसंग्रहालय (zoo) प्राधिकरणाअंतर्गत सुरू असते. त्यापैकी 12 प्रमुख प्राणिसंग्रहालयांनी त्यांच्या वर्षभरातील कामकाजाचा अहवाल प्राधिकरणाला सादर केला आहे. या अहवालांमधूनच प्राण्यांच्या मृत्यूंची ही धक्कादायक माहिती समोर आली आहे. मुंबई येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान आणि प्राणिसंग्रहालयामध्ये (राणीची बाग) राज्यात सर्वांत जास्त प्राण्यांचे मृत्यू झाले आहेत. येथील मृत प्राण्यांची संख्या 67 असून, दुसरा क्रमांक वर्ध्यातील 'पीपल्स फॉर अ‍ॅनिमल' या प्राणिसंग्रहालयाचा आहे.

येथील मृत प्राण्यांची संख्या 53 आहे, तर तिसरा क्रमांक पुण्यातील कात्रज येथील राजीव गांधी प्राणिसंग्रहालयाचा लागतो. राजीव गांधी प्राणिसंग्रहालयात 2019-20 या कालावधीत 35 विविध प्रकारच्या प्राण्यांचा मृत्यू झाला आहे.

मृत प्राण्यांमध्ये सर्वाधिक संख्या हरणांची

राज्यातील प्राणिसंग्रहालयात होणार्‍या प्राण्यांच्या मृत्यूंमध्ये सर्वाधिक संख्या विविध प्रकारच्या हरणांची आहे. हरीण हा प्राणी मुळातच भित्रा. त्यांच्या मृत्यूची कारणेसुध्दा प्राणिसंग्रहालय प्रशासनाने हृदयविकाराच्या धक्क्यानेच झाली असल्याची दिली आहेत. इतर प्राणी वय झाल्यामुळे आणि जखमांमुळे झालेल्या जिवाणूंच्या संसर्गाने (बॅक्टेरिया) झाल्याचे प्राणिसंग्रहालय प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

  • सर्वाधिक मृत्यू मुंबईतील राणीच्या बागेत
  • पुण्यातील राजीव गांधी प्राणिसंग्रहालय तिसर्‍या क्रमांकावर
  • केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाला दिलेल्या वार्षिक अहवालात नोंद

राज्यातील प्राण्यांचे कुठे, किती मृत्यू..?

वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान आणि प्राणिसंग्रहालय (राणीबाग) – 67

पीपल्स फॉर अ‍ॅनिमल, वर्धा – 53

राजीव गांधी प्राणिसंग्रहालय, कात्रज, पुणे-35

संजय गांधी नॅशनल पार्क आणि प्राणिसंग्रहालय – 12

रेस्क्यू सेंटर गोरेवाडा, नागपूर – 11

निसर्गकवी बहिणाबाई चौधरी प्राणिसंग्रहालय, पिंपरी-चिंचवड – 03

महात्मा गांधी राष्ट्रीय प्राणिसंग्रहालय, सोलापूर – 06

महाराजा बाग प्राणिसंग्रहालय, नागपूर – 05

केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाने (सेंट्रल झू अ‍ॅथॉरिटी) ठरवून दिलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार प्राण्यांच्या खंदकाची आणि आहाराची प्रथमत: व्यवस्था केली पाहिजे. त्यांच्या आहाराचे व्यवस्थापन करून त्यांना पौष्टिक आहार आवश्यक त्या प्रमाणात मिळायला हवा. त्याचबरोबर त्यांचे लसीकरण वेळेवर होणे आवश्यक असून, पशुवैद्यकीय पथकानेसुद्धा त्यांची वेळेवर तपासणी करणे आवश्यक आहे.
– राजकुमार जाधव, संचालक, राजीव गांधी प्राणिसंग्रहालय, कात्रज, पुणे

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news