Pimpri News : हाऊसिंग सोसायट्यांतील ‘एसटीपी’ शोभेचे ! | पुढारी

Pimpri News : हाऊसिंग सोसायट्यांतील ‘एसटीपी’ शोभेचे !

मिलिंद कांबळे

पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरात मोठमोठ्या हाऊसिंग सोसायट्या निर्माण झाल्या आहेत. शंभर व त्यापेक्षा अधिक सदनिका असलेल्या हाऊसिंग सोसायट्यांना आणि दररोज 20 हजार लिटर पाण्याचा वापर करणार्‍या संस्थांना मैलासांडपाणी शुद्धीकरण प्रकल्प (एसटीपी) स्वत:च्या जागेत उभारणे सक्तीचे आहे; मात्र वारंवार नोटिसा बजावून तसेच, दंड आकारूनही अनेक सोसायट्या बाराही महिने एसटीपी सुरू ठेवत नसल्याचे महापालिकेच्या पाहणीत उघड झाले आहे. विविध कारणे पुढे करून एसटीपीला नकार दिला जात असल्याने पाण्याच्या पुनर्वापराचे प्रमाण अद्यापही कमी आहे. परिणामी, पिण्याची पाण्याची मागणी वाढतच आहे.

22 डिसेंबर 2014 चे केंद्राचे परिपत्रक

केंद्र शासनाच्या नवी दिल्ली येथील पर्यावरण, वन व वातावरणीय बदल मंत्रालयाच्या 22 डिसेंबर 2014 च्या परिपत्रकानुसार 20 हजार चौरस मीटर बांधकाम किंवा बांधकाम प्रकल्पांना महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचा पर्यावरण ना हरकत घेणे आवश्यक आहे. त्याकरिता महापालिका नाहरकत दाखला देते. मात्र, अशा बांधकामांना ड्रेनेज कनेक्शन दिले जात नाही. त्या प्रकल्पाच्या आवारात तयार होणार्‍या मैलासांडपाण्यावर त्याच ठिकाणी प्रक्रिया करून त्याचा पुनर्वापर करणे बंधनकारक आहे. तसा कायदा केला आहे. तसेच, महाराष्ट्र शासनाने 2 डिसेंबर 2020 च्या नवीन एकत्रीत बांधकाम व विकास नियमावलीनुसार (युडीसीपीआर) महाराष्ट्र राज्यातील 10 हजार चौरस मीटर व त्यावरील मोठ्या क्षेत्रफळाच्या बांधकामांना किंवा 100 सदनिका असलेल्या किंवा 1,500 चौ.मी. बांधकाम असलेल्या किंवा दररोज 20 हजार लिटर पाण्याचा वापर करणार्या हाऊसिंग सोसायटी, शैक्षणिक संस्था, औद्योगिक, व्यापारी, सरकारी व निमसरकारी संस्था, हॉटेल्स, त ग्रे वॉटर ट्रीटमेंटनुसार पाण्याचा पुनर्वापर व पुनर्रचक्रिकरण करणे बंधनकारक आहे. एसटीपी न करणार्या सोसायट्या आणि आस्थापनांवर कारवाईचे अधिकार महापालिकेस देण्यात आला आहे.

…तर मिळकतकर बिलातही सवलत

वीस हजार चौरस मीटर बांधकाम असलेल्या गृहप्रकल्पात म्हणजे हाऊसिंग सोसायटीत एसटीपी उभारणे बंधनकारक आहे. सोसायटीने दररोज निर्माण होणार्‍या मैला सांडपाण्यावर प्रकिया करून त्या प्रकिया केलेल्या पाण्याचा उद्यानातील झाडे व रोपे, सोसायटीच्या आवारातील स्वच्छता, वाहने धुणे इत्यादी कारणासाठी वापरणे अपेक्षित आहे. प्रकिया केलेल्या पाण्याचा वापर झाल्याने पिण्याच्या पाण्याची मागणी कमी होऊन, शहरातील पाणीपुरवठ्याचा वाढता ताण कमी होण्यास मदत होणार आहे. एसटीपी उभारून पाण्याचा पुनर्वापर करणार्‍या सोसायट्यांना महापालिकेकडून मिळकतकर बिलात सवलतही दिली जाते.

या आहेत 41 हाऊसिंग सोसायट्या

सप्टेंबर 2023 ला केलेल्या सर्वेक्षणात शहरात एकूण 331 मोठ्या हाऊसिंग सोसायट्या आहेत. त्यापैकी 290 सोसायट्यांकडून एसटीपी चालविला जात आहे. तर, 41 सोसायट्यांकडे एसटीपी बंद आहेत. त्यात वाकड येथील श्रीगणेश एम्पायर, सिल्व्हर स्कायस्कोप, सोनिगरा केशर, नंदन इनस्पेरा को-ऑपरेटिव्ह सोसायटी, कोकणे चौक, रहाटणीतील श्री गणेश, आकुर्डीतील ऐश्वर्यम सोसायटी बी व्हेंचर्स, दत्तवाडी, आकुर्डी येथील मयूर समुद्धी फेज टू आणि मयूर समृद्धी फेज वन, मोरवाडीतील एसएनबीपी म्हाडा हाऊसिंग सोसायटी, काळेवाडीतील अदी अम्मा ब्लेस, गणेशनगर,

रावेत येथील आनंदबन, साईसरोज, भोंडवे एम्पायरर्स, शिंदेवस्ती येथील आदित्य मल्हार, जाधववाडी, चिखली येथील सिल्व्हर सत्यम, बोर्‍हाडेवाडी येथील ब्ल्यूबेल, सह्याद्री सारूबेरी, सिल्व्हर ओक्स सी, सेंट्रल पार्क रेसिडन्सी, साहील फोर्चून पार्क फेज वन, जाधववाडी येथील स्वस्तिक सिप्रा फेज वन, बनकरवस्ती, मोशी येथील अल्पाइन ऐऊरा, वडमुखवाडी येथील आनंद तरंग, डुडुळगाव आराध्यम ए. बी. सी. डी, मंथन ए, वंदे मातरम, व्हेनच्युअर सिटी एबीसीडी, कोनकोर्ड अमुल्यम, अकसा अमुल्यम, डुडुळगाव फाटा येथील नाथ रेसिडन्सी, काळजेवस्ती, चर्‍होली येथील अलंकार, पुनावळेतील जीके रोज मन्शन, पिंपरी येथील कोहिनूर वर्ल्ड टॉवर या हाऊसिंग सोसायटींचे एसटीपी बंद आहेत.

मात्र, काही सोसायट्या खर्च अधिक होत असल्याचे कारण पुढे करून एसटीपी बंद ठेवत आहेत. एसटीपीकडे दुर्लक्ष करीत आहेत. तर, काही सोसायट्यांनी महापालिकेच्या पथकास सोसायटीमध्ये प्रवेश नाकारला आहे. एसटीपी बंद ठेवणार्‍या शहरात 41 मोठ्या हाऊसिंग सोसायट्या आहेत. वारंवार नोटिसा देऊनही प्रतिसाद मिळत नसल्याने त्या सोसायट्यांचा पाणीपुरवठा बंद करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. त्यामुळे त्या सोसायटींचे धाबे दणाणले आहेत.

पालिकेस पाणीपुरवठा खंडित करण्याचा अधिकार नाही. पालिकेने स्वत: जाऊन त्या सोसायट्यांचा सर्वे केला आहे का ही शंका आहे. बांधकाम व्यावसायिकांनी एसटीपी बांधून दिलेले नाहीत. त्यांना दंड न करता एनओसी दिली. आता सोसायट्यांवर कारवाई केली जात आहे. सदनिकाधारक प्रामाणिकपणे मिळकतकर भरतात. सोसायट्यांना एसटीपीची जबरदस्ती नसावी, असे, पिंपरी-चिंचवड हाऊसिंग सोसायटी ऑफ फेडरेशनचे अध्यक्ष दत्तात्रय देशमुख यांनी सांगितले.

या सोसायटीत पथकास नो एन्ट्री

वाकड येथील लोरेले सोसायटी, पलास सोसायटी आणि पिंपळे गुरव येथील सोहम रेसिडन्सी या तीन सोसायट्यांनी महापालिकेच्या पथकास प्रवेश दिला नाही. केशवनगर, चिंचवड येथील सुखवानी फॉसिफिक, उद्योगनगर, पिंपरी येथील शारदा रेसिडन्सी, चिखली येथील जीके एसटी कन्वर राम पालसिको फेस टू, मोशी गाव येथील सेरेने होम्स, थेरगाव येथील सालाना सोसायटी येथील एसटीबी बांधकाम व्यावसायिकांनी सोसायटीकडे हस्तांतरीत केलेले नाहीत.

एसटीपी सुरू करण्याबाबत शहरातील मोठ्या हाऊसिंग सोसायट्यांना वारंवार पत्र देण्यात आले आहेत. तसेच, नोटिसाही बजावण्यात आल्या आहेत. जुलै, ऑगस्ट व सप्टेंबर 2023 अशा तीन वेळा प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली आहे. तरीही एसटीपी सुरू न केल्याने महापालिकेस पाणीपुरवठा खंडित करण्याचे पाऊल उचलावे लागत आहे.

– संजय कुलकर्णी, सहशहर अभियंता, पर्यावरण अभियांत्रिकी विभाग महापालिका

हेही वाचा

Back to top button