कीटकाच्या आकाराचे ड्रोन शोधणे ठरते मोठे आव्हान | पुढारी

कीटकाच्या आकाराचे ड्रोन शोधणे ठरते मोठे आव्हान

पुणे : ड्रोन तंत्रज्ञानात प्रचंड वेगाने बदल होत आहेत. आता चक्क कीटकाच्या आकाराचे ड्रोन आले आहेत. त्यामुळे शत्रू कसा येईल याचा तपास घेणे जेवढे सोपे झाले आहे, तितकेच अवघडही झाले आहे, अशी माहिती लोणावळा येथील आयएनएस शिवाजी या नौदलाच्या तळाचे कमोडोर (कमांडिंग ऑफिसर) मोहित गोयल यांनी दै. ’पुढारी’शी बोलताना दिली. लोणावळा येथील आयएनएस शिवाजी येथे सोमवारी 4 डिसेंबर रोजी राष्ट्रीय नौदल दिवस थाटात साजरा करण्यात आला. त्या निमित्ताने या तळाचे प्रमुख कमोडोर मोहित गोयल यांच्याशी ’नौदलापुढील आव्हाने आणि आधुनिक तंत्रज्ञानाचे फायदे’ या विषयावर संवाद साधला. ड्रोन तंत्रज्ञानातील बदल, सागरी सीमांचे रक्षण, नौदलात महिलांची नवी भरती, हनी ट्रॅपबाबतची सावधानता या विषयांवर विचारलेल्या प्रश्नांची त्यांनी मनमोकळी उत्तरे दिली.

ड्रोन बनले मिनी हेलिकॉप्टर

सागरी सीमा असो नाही तर जमिनीवरच्या सीमा असो, त्यांचे रक्षण करणे अतिशय आव्हानात्मक ठरले आहे. ड्रोन तंत्रज्ञानाचा आता सर्वंच सीमांवर भरपूर उपयोग होत आहे. ड्रोन हे मिसाईल सारखेच वापरले जात आहे. कारण, ते मिसाईलपेक्षा खूप स्वस्त असल्याने अगदी छोटी मिसाईल नेता येतील असे तंत्रज्ञान तयार झाले आहे. आता ड्रोनचा वापर शस्त्रांसारखा होत आहे, त्यामुळे हे शस्त्रास्त्र युक्त ड्रोन ओळखण्यासाठी सीमेवर सतत सतर्क रहावे लागते.

ड्रोनविरोधी यंत्रणा आवश्यक

ड्रोन तंत्रज्ञान वेगाने विकसित होत आहे. कीटकांच्या आकाराचे ड्रोन आल्याने ते शोधून काढणे मोठे आव्हान ठरत आहे. त्यामुळे आता अन्टीड्रोन तंत्रज्ञान विकसित करावे लागले आहे.

नौदलात यापुढे 25 टक्के महिला

यंदा नौदलात मुलींची पहिली तुकडी दाखल झाली त्याबाबत विचरले असता ते म्हणाले की, आयएनएस शिवाजी या संस्थेत यंदा 60 मुलींची तुकडी दाखल झाली आहे. आजवर मुलेच आमच्याकडे प्रशिक्षणा साठी येत. पण एप्रिल 2022 पासून मुलींची स्वतंत्र तुकडी सुरू झाली. आगामी काही वर्षांतच नौदलात 25 टक्के महिलांचा सहभाग असेल.

हनी ट्रॅपमुळे चिनी अ‍ॅपवर बंदी

हनी ट्रॅपपासून वाचवण्यासाठी नौदल काय काळजी घेत आहे. या प्रश्नावर गोयल यांनी सांगितले की, हनी ट्रॅप हा सामाजिक विषय आहे. त्यासाठी आम्ही सतत सतर्क आहोत. यात प्रामुख्याने चिनी अ‍ॅपवर बंदी घातली आहे.

हेही वाचा

Back to top button