गोष्ट जिद्दीची : अपंगत्वावर मात करीत त्याने जिंकली आयुष्याची लढाई | पुढारी

गोष्ट जिद्दीची : अपंगत्वावर मात करीत त्याने जिंकली आयुष्याची लढाई

दीपेश सुराणा

पिंपरी : अनंत आमुची ध्येयासक्ती, अनंत अन आशा किनारा तुला पामराला.. असे वि. वा. शिरवाडकर अर्थात कुसुमाग्रज यांनी त्यांच्या कवितेत म्हटले आहे. कवितेतील हे बोल प्रत्यक्ष जीवनात जगून आयुष्याची लढाई जिंकण्याचे काम चिंचवड-संभाजीनगर येथील मनोहर भांबरे यांनी केले आहे. पायांनी अधू असतानाही मनोहर यांनी सुरुवातीला अकाउंट असिस्टंट त्यानंतर अकाउंटंट आणि त्यानंतर सीनिअर को-ऑर्डिनेटर (फायनान्स) या पदापर्यंत मजल मारली आहे.

मनोहर यांना वयाच्या एक वर्षानंतर पोलिओ झाला. त्यामुळे त्यांचे दोन्ही पाय अधू झाले. तसेच, एका हातालाही थोडे व्यंग आले. तरीही, त्यांच्या कुटुंबीयांनी हार मानली नाही. त्यांनी मनोहरला निगडी-यमुनानगर येथील पिंपरी-चिंचवड अपंग मित्र मंडळ संचालित अपंग विद्यालयात शिक्षणासाठी पाठविले. मनोहर यांनी तेथे पहिली ते चौथीचे शिक्षण पूर्ण केले. येथे त्यांना स्वावलंबनाचे धडे मिळाले. स्वतःची कामे स्वतः कशी करायची, याविषयी त्यांना शिकविण्यात आले. तेथील वसतिगृहात राहत त्यांनी निगडी येथील महापालिका शाळेत पाचवी ते दहावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. निगडीतील म्हाळसाकांत महाविद्यालयात अकरावी, बारावी पूर्ण केली. तर, प्रा. रामकृष्ण मोरे महाविद्यालयातुन बी.कॉम.ची पदवी घेतली. तर, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून बहिःस्थ माध्यमातून एम.कॉम.चे शिक्षण घेतले.

…मात्र जिद्द सोडली नाही

मनोहर यांनी शिक्षण पूर्ण केल्यानंतर सुरुवातीला कंत्राटी पद्धतीने पिंपरी-चिंचवड महापालिकेत कर्मचारी म्हणून काम केले. त्यानंतर, चिंचवड एमआयडीसीतील एका कंपनीत ते 2009 मध्ये अकाउंंट असिस्टंट म्हणून रुजू झाले. मात्र, त्यांनी जिद्द सोडली नाही. कामात वेगळेपणा दाखवत त्यांनी अकाउंंटंट पद मिळविले. त्यानंतर आता त्यांनी सीनिअर को-ऑर्डिनेटर (फायनान्स) या पदापर्यंत मजल मारली. कॅलिपर आणि कुबड्यांच्या सहाय्याने ते सध्या चालतात. व्यंगावर मात करत अखेर ते जीवनात यशस्वी झाले.

मला दोन्ही पायांनी चालायचे असल्यास कॅलिपर आणि कुबड्यांचा आधार घ्यावा लागतो. मात्र, अपंग विद्यालयाने स्वावलंबी बनविल्याने मी व्यंगावर मात करीत जीवनात यश मिळवू शकलो. जीवनात बर्याच अडचणींना सामोरे जावे लागले. मात्र, हार मानली नाही. कुटुंबातूनही चांगली साथ मिळाली. त्यामुळे स्वतःच्या पायावर उभा राहू शकलो. सध्या सीनिअर को-ऑर्डिनेटर म्हणून काम करत आहे.

– मनोहर भांबरे, सीनिअर को-ऑर्डिनेटर (फायनान्स)

अपंग विद्यालयामध्ये सध्या 25 विद्यार्थी आहेत. त्यांना आम्ही मोफत सुविधा देत आहोत. येथे विद्यार्थ्यांना स्वतःची कामे स्वतः कशी करायची, याचे आम्ही प्रशिक्षण देतो. त्याचप्रमाणे, पहिली ते चौथीपर्यंत शिक्षणाची सोय देखील आहे. त्यानंतरही पुढील शिक्षणासाठी विद्यार्थी येथील वसतिगृहात राहू शकतात.

– वैशाली भोईटे, कोषाध्यक्ष, अपंग विद्यालय, निगडी.

हेही वाचा

Back to top button