Crime news : पिस्तूल दाखवून चालकाचे अपहरण करणारे जेरबंद | पुढारी

Crime news : पिस्तूल दाखवून चालकाचे अपहरण करणारे जेरबंद

नारायणगाव : पुढारी वृत्तसेवा :  मालवाहू ट्रकचालकाला पिस्तुलाचा धाक दाखवून मालट्रकसह टायरची चोरी करणार्‍या जुन्नर येथील दोन तरुणांना स्थानिक गुन्हे शाखा व नारायणगाव पोलिस यांच्या संयुक्त पथकाने अटक केली. आरोपींकडून गुन्ह्यासाठी वापरलेली मोटारकार व चोरी केलेला मालवाहू ट्रक, टायर असा 15 लाख 70 हजार रुपयांचा माल जप्त केला आहे, अशी माहिती नारायणगावचे सहायक पोलिस निरीक्षक महादेव शेलार यांनी दिली. याप्रकरणी बलवीर गजराज सिंग (वय 50, सध्या रा. निघोज व्हिलेज, चाकण, ता. खेड, मूळ रा. लेवडा, ता. कामा, जि. डीग भरतपूर, राजस्थान) या ट्रकचालकाने दिलेल्या फिर्यादीवरून आतिफ अहमद बेग (वय 30) आणि शफिक रफिक सय्यद (वय 40, दोघेही रा. मंगळवार पेठ, जुन्नर) यांना अटक करण्यात आली.

संबंधित बातम्या :

याबाबत सहायक पोलिस निरीक्षक शेलार म्हणाले, फिर्यादी बलवीर सिंग हे टायर असलेला मालवाहू ट्रक घेऊन पुणे येथून नाशिकच्या दिशेने निघाले होते. वरील दोघांनी मोटारकार आडवी लावून माल ट्रक थांबवला. पिस्तूलचा धाक दाखवून फिर्यादीच्या डोक्याला काळे फडके बांधून व हातपाय बांधून मोटारमध्ये जबरदस्तीने बसवले. त्यानंतर ट्रकसह टायरची चोरी केली. याप्रकरणी त्या वेळी दोघा अज्ञातांविरोधात नारायणगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

घटनेचे गांभीर्य ओळखून जबरी चोरीचा तपास स्थानिक गुन्हे शाखा व नारायणगाव पोलिस करत होते. दरम्यान, जुन्नर येथील आतिफ अहमद बेग आणि शफिक रफिक सय्यद या दोघांना पोलिसांनी संशयावरून ताब्यात घेतले. त्यांनी आरोपींनी गुन्हा कबूल केला. त्यांच्याकडून या गुन्ह्यात वापरलेली 5 लाख रुपये किमतीची स्विफ्ट कार, चोरी केलेला 10 लाख रुपये किमतीचा मालट्रक व 70 हजार रुपये किमतीचे टायर असा एकूण 15 लाख 70 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

ही कारवाई पोलिस अधीक्षक अंकित गोयल, अप्पर पोलिस अधीक्षक मितेश घट्टे, उपविभागीय पोलिस अधिकारी रवींद्र चौधर यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अविनाश शिळीमकर, सहायक पोलिस निरीक्षक शेलार, फौजदार अभिजित सावंत, अमित सिद पाटील, फौजदार सनील धनवे, पोलिस हवालदार दीपक साबळे, विक्रम तापकीर, राजू मोमीन, अतुल डेरे, पोलिस नाईक संदीप वारे,अक्षय नवले, नीलेश सुपेकर, मुकुंद कदम, रमेश काठे, गोरक्ष हासे, महेश काठमोरे, सत्यम केळकर, गोविंद केंद्रे, सचिन सातपुते, होमगार्ड जेजुरकर, नवले यांच्या पथकाने केली.

Back to top button