संजीवन समाधी सोहळा : प्रशासनाची जय्यत तयारी ; असा असेल एकूण कार्यक्रम | पुढारी

संजीवन समाधी सोहळा : प्रशासनाची जय्यत तयारी ; असा असेल एकूण कार्यक्रम

आळंदी : पुढारी वृत्तसेवा :  संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या संजीवन समाधी सोहळ्याला मंगळवार (दि. 5) पासून माउलींच्या पालखी सोहळ्याचे जनक गुरुवर्य हैबतबाबा आरफळकर यांच्या पायरीपूजनाने प्रारंभ होणार आहे. यानिमित्त दि. 5 ते 12 डिसेंबर या कालावधीत आळंदीत कार्तिकी वारी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी राज्यभरातील वारकरी भाविक आळंदीनगरीत दाखल होऊ लागले आहेत.

कार्तिकी वारी सोहळ्याची जय्यत तयारी आळंदी देवस्थान व आळंदी पालिका यांच्या वतीने सुरू आहे. देवस्थानतर्फे भाविकांसाठी भव्य दर्शन बारी उभारण्यात येत आहे. भाविकांना पिण्याचे पाणी, आरोग्य तपासणी, मोबाईल टॉयलेट आदी सोयीसुविधा देखील देवस्थानतर्फे उपलब्ध करण्यात येणार आहेत. सध्या शौचालय दुरुस्ती, मोबाईल टॉयलेट उभारणी सुरू आहे. शहरात पाणीपुरवठा सुरळीत व मुबलक करण्याबाबत नियोजन करण्यात येत आहे.

आळंदीत दरवर्षी कार्तिकी वारी सोहळ्यासाठी लाखोच्या संख्येने भाविक येत असतात. कार्तिकी वद्य एकादशीला मध्यरात्रीपासून माउलींच्या संजिीन समाधीवर अकरा ब्रह्मवृंदाच्या मंत्रोच्चारात पवमानपूजा, दुग्धाभिषेक होईल. त्यानंतर दुपारी माउलींची पालखी नगरप्रदक्षिणेसाठी देऊळवाड्याच्या बाहेर पडेल. नगरप्रदक्षिणेनंतर पालखी सायंकाळी मंदिरात पुन्हा प्रवेश करेल. दरम्यान, भाविकांचे दर्शन दिवसभर सुरू राहणार आहे.

रविवारी (दि. 10) मध्यरात्री प्रांताधिकार्‍यांच्या हस्ते माउलींच्या समाधीवर पहाटपूजा होईल. त्यानंतर दुपारी रथोत्सवासाठी माउलींची पालखी मंदिरातून बाहेर पडेल. गोपाळपुरा येथे माउलींची पालखी रथात ठेवून नगरप्रदक्षिणा केली जाणार आहे. सोमवारी (दि. 12) माउलींचा मुख्य समाधिदिन सोहळा असून, मध्यरात्री प्रमुख विश्वस्तांच्या हस्ते पवमान अभिषेक केला जाणार आहे. त्यानंतर सकाळी 10 ते 12 या कालावधीत वीणामंडपात संत नामदेव महाराजांचे वंशज नामदास महाराज यांचे माउलींच्या समाधी सोहळ्याचे कीर्तन होईल. दुपारी 12 वाजता घंटानाद, पुष्पवृष्टी आणि आरती झाल्यानंतर माउलींचा समाधी दिनाचा कार्यक्रम पूर्ण होईल. त्यानंतर आरफळकरांच्या वतीने जागर होईल. शेवटी अमावास्येला मंगळवारी (दि. 12) समाधी सोहळ्याच्या कार्यक्रमाची सांगता फटाक्यांची आतषबाजी आणि पालखी छबिना मिरवणुकीने होईल.

कार्तिकी वारीतील मुख्य कार्यक्रम
संत ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधी मंदिराच्या महाद्वारातील गुरू हैबतबाबांचे पायरीपूजन मंगळवारी (दि. 5) होईल. मुख्य कार्तिकी एकादशी शनिवारी (दि. 9), तर माउलींचा संजीवन समाधी दिन सोहळा सोमवारी (दि. 11) परंपरेने होणार आहे.

सोहळ्यानिमित्त वाहतुकीत असेल हा बदल 

कार्तिक यात्रेनिमित्त  मरकळ येथून आळंदीकडे जाणारी जड वाहतूक पर्यायी मार्गाने करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. जड वाहनांनी नगर रस्ता, लोणीकंद, खराडी, येरवडामार्गे गोल्फ क्लब चौक, आळंदी रस्ता, चंद्रमा चौक, होळकर पूल, जुना मुंबई-पुणे रस्ता, बोपोडी, नाशिक फाटा चौकमार्गे  या मार्गाचा वापर करावा असेही सांगण्यात आले आहे.

 

हेही वाचा :

Back to top button