

चाकण : पुढारी वृत्तसेवा : ट्रक थांबवून आराम करत असलेल्या ट्रकचालकाला मारहाण करून ट्रक व ट्रकमधील महागडा माल असा एकूण तब्बल 37 लाख रुपयांचा ऐवज घेऊन टोळके पसार झाले. हा दरोड्याचा प्रकार खराबवाडी (ता. खेड) येथे घडला. याप्रकरणी महाळुंगे पोलिसांनी चाकण औद्योगिक भागात वास्तव्यास असलेल्या मूळच्या यवतमाळ जिल्ह्यातील टोळीस गजाआड केले आहे.
याप्रकरणी महाळुंगे एमआयडीसी पोलिस ठाण्यात विजय तुकाराम पिंगळे (वय 52, रा. बारामती) यांनी फिर्याद दिली आहे. या फिर्यादीवरून पोलिसांनी तपास करत भारत आनंदा सारवे (वय 23), सागर यशवंत पाटील (वय 24), निरंजन राजेंद्र पाटील (वय 21), आशिष ऊर्फ बबलू वसंत आडे (वय 28), विकास सुखलाल पवार (वय 22, सर्वजण सध्या रा. महाळुंगे, ता. खेड, मूळ रा. यवतमाळ) व संतोष ऊर्फ दाजी विठ्ठल काळे (वय 29, सध्या रा. महाळुंगे, मूळ रा. दोंदे, ता. खेड) या सहा जणांना अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी विजय पिंगळे हे त्यांच्या ताब्यातील ट्रक (एमएच 09 एफएल 8191) घेऊन फुरसुंगी येथे जाणार होते. या ट्रकमध्ये रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीच्या प्लास्टिक दाना असलेल्या तब्बल 20 लाख रुपयांच्या 800 बॅग होत्या. खराबवाडी येथे आले असता फिर्यादी हे गाडी थांबून काही वेळ आराम करत होते. या वेळी वरील संशयित तेथे आले. त्यांनी ट्रकचालकास मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यांनी फिर्यादीच्या तोंडावर टॉवेल टाकून फिर्यादीकडील रोख रक्कम, मोबाईल फोन तसेच 17 लाख रुपये किमतीचा ट्रक व त्यातील 20 लाखांचे साहित्य असा सर्व ऐवज घेऊन गेले. आरोपींनी ट्रकचालकास तळेगाव पोलिस ठाण्याजवळ एका अनोळखी रस्त्यावर सोडून दिले होते. फिर्यादी यांनी अखेर महाळुंगे एमआयडीसी पोलिस ठाणे गाठत तक्रार दिली. त्यानंतर पोलिसांनी सर्व संशयितांना ताब्यात घेत 37 लाखांचा सर्व मुद्देमालदेखील हस्तगत केला आहे. महाळुंगे पोलिस या घटनेचा तपास करीत आहेत.
हेही वाचा :