सोलापूर; पुढारी वृत्तसेवा : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन सहा डिसेंबरला मध्य रेल्वे 16 अनारक्षित विशेष गाड्या चालवणार आहे. दरम्यान, सोलापूर ते मुंबई, कलबुर्गी ते मुंबई अशा दोन विशेष गाड्यांची सोय करण्यात आल्याची माहिती रेल्वे प्रशासनाच्या वतीने देण्यात आली.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त सहा डिसेंबर रोजी सोलापूर जिल्ह्यातील भीमसैनिक हजारोंच्या संख्येने मुंबईला जात असतात. दरम्यान याहीवर्षी विशेष गाडीचे नियोजन करण्यात आले आहे. सोलापूर-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईसाठी सोलापूर येथून मंगळवार 5 डिसेंबर रोजी रात्री दहा वाजून वीस मिनिटांनी गाडी सुटणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सुटणारी गाडे दुसर्या दिवशी सकाळी आठ वाजून वीस वाजता पोहोचेल. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून 7 डिसेंबर रोजी गुरुवारी रात्री 12 वाजून 25 वाजता सुटेल. सोलापूर येथे त्या दिवशी सकाळी नऊ वाजता पोहोचणार आहे.
सोलापूर, कुर्डूवाडी, दौंड, पुणे, लोणावळा, कल्याण, दादर आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई या ठिकाणी थांबे देण्यात आले आहे. कलबुर्गी येथून पाच डिसेंबरला सायंकाळी साडेसहा वाजता गाडी सुटणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे दुसर्या दिवशी सकाळी आठ वाजून वीस वाजता पोहोचेल. 7 डिसेंबरला मध्यरात्री सव्वा बारा वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईतून सुटेल. कलबुर्गी येथे त्याच दिवशी अकरा वाजून 30 वाजता पोहोचेल. यासाठी कलबुर्गी, गंगापूर रोड, अक्कलकोट , सोलापूर, कुर्डवाडी ,दौंड ,पुणे लोणावळा ,कल्याण ,दादर आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई या ठिकाणी थांबा देण्यात आला आहे.