तगड्या पोलिस बंदोबस्तात, भिडे वाड्याचे सक्तीने भूसंपादन | पुढारी

तगड्या पोलिस बंदोबस्तात, भिडे वाड्याचे सक्तीने भूसंपादन

पुणे : पुढारी वृत्तसेवा : जागा खाली करण्याची मुदत संपताच महापालिकेने सोमवारी रात्री मोठ्या फौज फाट्यामध्ये भिडे वाड्याची जागा ताब्यात घेतली. तगड्या‌ पोलिस बंदोबस्तामध्ये रात्री आकरा वाजता सुरू झालेली भूसंपादनाची कारवाई मंगळवारी पहाटेपर्यंत‌ सुरू होती. महात्मा जोतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी शिवाजी रस्त्यावर बुधवार पेठेतील भिडे वाडा येथे मुलींची पहिली शाळा सुरू केली होती. या वाड्याचे राष्ट्रीय स्मारक करण्याचा निर्णय पालिकेने घेतला होता.

या निर्णयाला जागामालक व पोटभाडेकरूंनी 2010 मध्ये पहिल्यांदा उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. उच्च न्यायालयाने याचिका निकाली काढून महापालिकेने यापूर्वी केलेल्या निवाड्यानुसार; तसेच 201 3मधील कायद्यानुसार जागेचा मोबदला देण्याचे आदेश दिले. त्यानंतर याचिकाकर्त्यांनी उच्च न्यायालयाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने महापालिकेच्या बाजुने निकाल देत स्मारकास लागलेला 13 वर्षांचा कालावधी योग्य नसल्याची नाराजी व्यक्त करत हे स्मारक यापूर्वीच व्हायला हवे होते. न्यायालयाचा वेळ वाया घालवल्याने दंडात्मक कारवाई का करण्यात येऊ नये, असा प्रश्नही याचिकाकर्त्यांपुढे न्यायमूर्तींनी उपस्थित केला होता. तसेच भिडेवाड्याची जागा एका महिन्याच्या आत महापालिकेच्या ताब्यात देण्यात यावी; अन्यथा महापालिकेने जबरदस्तीने ती जागा ताब्यात घ्यावी, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले होते.

जागा खाली करण्याची एक महिन्याची मुदत 3 डिसेंबर रोजी संपली. तत्पुर्वी भिडेवाड्यातील भाडेकरूंनी कारवाईस स्थगिती देण्यासाठी व जागा ताब्यात देण्यासाठी मुदतवाढ देण्याच्या मागणीसाठी पुन्हा न्यायालयात धाव घेतली. स्थगिती तारीख देण्याची मागणी सोमवारी भाडेकरूंनी न्यायालयात केली मात्र, न्यायालयाचे त्यावर कोणताही निर्णय दिला नाही.
दरम्यान, न्यायालयाने दिलेली मुदत संपल्यानंतर जागेचा पंचनामा करणे, भाडेकरूंना नोटीस देणे आदी कार्यवाही करण्यासाठी महापालिकेच्या भुसंपादन विभागाच्या अधिकार्‍यांनी सोमवारी भिडे वाडा गाठला. मात्र, भाडेकरूनी दुकाने बंद ठेवून असहकार धोरण अवलंबिले. त्यामुळे महापालिकेच्या अधिकार्‍यांना मोकळ्या हाताने परतावे लागले होते.

त्यानंतर महापालिकेने पोलिस आयुक्तांशी पत्रव्यवहार करून सोमवारी रात्री अकरा वाजता कडेकोट पोलिस बंदोबस्तामध्ये वाड्याची जागा ताब्यात घेण्याची प्रक्रीया हाती घेतली. या कारवाईत चार जेसीबी, एक क्रेन, टिपर, अग्निशामक दलाच्या गाड्या, अतिक्रमण विभागाच्या गाड्या, टिपर आदींसह शंभर ते‌सव्वाशे कामगारांचा समावेश होता. कारवाईवेळी पोलिसांनी मजुर आड्डा‌ चौक आणि बैलबाग चौक या दरम्यान बॅरिकेट लावून शिवाजी रस्ता बंद केला होता.

कारवाई वेळी महापालिका अतिरिक्त आयुक्त विकास‌ ढाकणे, भूसंपादन विभागाच्या उपायुक्त प्रतिभा पाटील, अतिक्रमणचे उपायुक्त माधव जगताप, परिमंडळ एकचे पोलिस उपायुक्त संदीपसिंग गिल, सहाय्यक पोलिस आयुक्त अशोक धुमाळ, फरासखान्याचे वरीष्ठ पोलिस निरीक्षक दादासाहेब चुडाप्पा, विश्रामबागचे पोलिस निरीक्षक (गुन्हे) दादासाहेब गायकवाड यांच्यासह मोठ्या प्रमाणात पोलिस व महापालिकेचे कर्मचारी उपस्थित होते.

फुले दाम्पत्याचा फोटो ठेवून ठिय्या :

भिडे वाडा स्मारकाच्या जागेवरील भाडेकरूंना प्रशासन सक्तीने भूसंपादन करणार असल्याची कुणकुण लागली होती. त्यामुळे भाडेकरूंनी महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांचे‌ फोटो ठेवून ठिय्या दिला होता. वादाचा प्रसंग‌ टाळण्यासाठी पोलिसांनी मोठा बंदोबस्त तैनात केला होता. पोलिसांनी पावणे अकराच्या सुमारास भाडेकरूना फोटो हटवण्याची विनंती केली. पोलिसांची विनंती मान्य करत भाडेकरूंनी फोटो काढला, तसेच कारवाईबद्दल नाराजी वक्त केली. यावेळी भाडेकरूंचे डोळे पाणावले होते.

प्रशासनाने पोटावर पाय देवून नये

आमच्या अनेक पिढ्या या ठिकाणी व्यवसाय करत आहेत. भाडेकरू व्यवसायिकांना या ठिकाणीच जागा देवून स्मारक करता येऊ शकते. आता जेवढी आहे, त्यापेक्षा कमी जागा द्या. महापालिकेने कधीही आम्हाला विश्वासात घेतले नाही. पालिका अधिकारी दाखवतात एक आणि करतात दुसरे. स्मारक बांधण्याला आमचा विरोध नाही. मात्र, प्रशासनाने आमच्या पोटावर पाय देवू नये.

– समिर धाडगे,व्यवसायिक भाडेकरू 

हेही वाचा

Back to top button