फर्ग्युसन रस्त्यावरील बेकायदा मॉल जमीनदोस्त; महापालिकेची कारवाई | पुढारी

फर्ग्युसन रस्त्यावरील बेकायदा मॉल जमीनदोस्त; महापालिकेची कारवाई

पुणे : न्यायालयाने आठ वर्षांनंतर स्थगिती उठवल्याने महापालिकेच्या बांधकाम विभागाने फर्ग्युसन रस्त्यावरील शिरोळे प्लॉटवर सुरू असलेला बेकायदा शॉपिंग मॉल सोमवारी जमीनदोस्त केला. बांधकाम विभागाने मोठ्या प्रमाणावर मनुष्यबळ आणि पोलिस बंदोबस्त लावून येथील 70 स्टॉलवर कारवाई केली. फर्ग्युसन रस्त्यावरील शिरोळे प्लॉट येथे लोखंडी अँगल्स, गर्डर आणि पर्त्यांचा वापर करून विनापरवाना शॉपिंग मॉल उभारण्यात आला होता.

याठिकाणी छोटी मोठी मिळून 70 स्टॉल वजा दुकाने सुरू होती. महापालिकेने या मॉलविरोधात यापूर्वीही कारवाईचा प्रयत्न केला होता. त्या वेळी संबंधित जागामालक पालिकेच्या कार्यवाही विरोधात न्यायालयात गेले होते. न्यायालयाने कारवाईस स्थगिती दिल्याने मागील आठ वर्षांपासून हा मॉल सुरू होता. महापालिकेने ही याचिका लवकर निकाली काढण्याच्या दृष्टीने वकिलांची फौज उभी केली होती. अखेर न्यायालयाने ही स्थगिती उठविल्याने बांधकाम विभागाने सोमवारी सकाळी मॉल पाडण्याची कारवाई हाती घेतली.

एवढेच नव्हे, तर न्यायालयात कॅव्हेट दाखल करून संधी साधली. बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता युवराज देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यकारी अभियंता बिपीन शिंदे यांच्या नेतृत्वाखालील उपअभियंता सुनील कदम, शाखा अभियंता राहुल रसाळे, समीर गडई यांच्या पथकाने जेसीबी, गॅस कटर, ब—ेकर, 15 बिगारी आणि शिवाजीनगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक विपिन हसबनीस यांच्या नेतृत्वाखालील पोलिस बंदोबस्तात सुमारे सात हजार चौ. फुटांचा मॉलचा सांगाडा जमीनदोस्त केला. अग्निशामक दलाची एक गाडीदेखील तयार ठेवली होती, अशी माहिती सुनील कदम यांनी दिली.

हेही वाचा

Back to top button