तीन राज्यांत भाजपची कमाल, गुंतवणूकदार झाले मालामाल | पुढारी

तीन राज्यांत भाजपची कमाल, गुंतवणूकदार झाले मालामाल

मुंबई : पुढील वर्षी होणार असलेल्या लोकसभा निवडणुकीची रंगीत तालीम मानली जात असलेल्या विधानसभा निवडणुकीत तीन राज्यांमध्ये भारतीय जनता पक्षाचे कमळ फुलले. त्याचे पडसाद सोमवारी शेअर बाजारात दिसून आले. सेन्सेक्सने तब्बल 1384 आणि निफ्टीने 419 अंकांची ऐतिहासिक उसळी घेत निर्देशांकाची उच्चांकी पातळी गाठली. त्यामुळे गुंतवणूकदारांनी जवळपास पावणेसहा लाख कोटींची घसघशीत कमाई केली.

रविवारी देशातील विविध राज्यांतील विधानसभेचा निकाल हाती आला. त्यात भाजपने छत्तीसगड आणि राजस्थानमधील सत्ता काँग्रेसकडून खेचून आणली. मध्य प्रदेशातील सत्ता राखण्यात यश मिळवले. तेलंगणा राज्यात काँग्रेसची सत्ता आली. पुढील वर्षी लोकसभा निवडणूक होत आहे. त्या पार्श्वभूमीवर या राज्यांच्या निवडणुका भाजपासाठी लिटमस टेस्ट मानली जात होती.

सेन्सेक्स 2.05 टक्क्यांची उसळी घेऊन 68,865 अंकांवर स्थिरावला. तसेच निफ्टी 2.07 टक्क्यांनी वाढून 20,686 अंकांवर बंद झाला. निफ्टीने ऐतिहासिक अंकांचा टप्पा पार केला. निफ्टी पीएसयू बँक निर्देशांक 3,88 टक्क्यांनी वाढला. निफ्टी बँक, प्रायव्हेट बँक 3.6 आणि निफ्टी फायनान्शियल सर्व्हिसेस निर्देशांक 3.25 टक्क्यांनी वाढला. बीएसई मिडकॅप इंडेक्सने 35,124 अंकांचा ऐतिहासिक टप्पा गाठला. स्मॉलकॅप निर्देशांक 41,222 अंकांवर गेला. या दोन्ही निर्देशांकात प्रत्येकी 1.2 टक्क्यांनी वाढ झाली.

आयसीआयसीआय, कोटक, एसबीआयच्या शेअरमध्ये चार ते पाच टक्क्यांनी वाढ झाली. इंडसइंड बँक, एचडीएफसी, अल्ट्राटेक सिमेंट, बजाज फायनान्स, एनटीपीसी, अ‍ॅक्सिस बँक आणि महिंद्रा अँड महिंद्राच्या शेअरनेही उसळी घेतली. अदानी ग्रीन एनर्जीने 9.4 टक्क्यांनी उसळी घेतली. तर, अदानी पोर्ट, गॅस, एसीसी, पॉवर आणि पोर्ट कंपन्यांच्या शेअरमध्ये चार ते सहा टक्क्यांनी वाढ झाली. विप्रो, मारुती, सन फार्मा, टाटा मोटर्सचे शेअर घसरले.

बीएसईचा भाव पावणेसहा लाख कोटींनी वधारला

मुंबई शेअर बाजारात (बीएसई) सेन्सेक्सने 1384 अंकांची उसळी घेतली. त्यामुळे बीएसईत नोंदीत कंपन्यांचे बाजारमूल्य 5.78 लाख कोटी रुपयांनी वाढून 343.34 लाख कोटी रुपयांवर गेले. बीएसईतील 2,392 कंपन्यांचे शेअर वधारले असून, 1,447 कंपन्यांच्या शेअरमध्ये घट झाली. तर 179 कंपन्यांच्या शेअरचे भाव टिकून होते.

Back to top button