पनौती नावाचं कॅम्पेन भाजपाने केले : नाना पटोले | पुढारी

पनौती नावाचं कॅम्पेन भाजपाने केले : नाना पटोले

नागपूर; पुढारी वृत्तसेवा : पनौती हे नाव देशाच्या जनतेने दिलं, कॉंग्रेसने दिलेलं नाही. पंतप्रधान मोदी यांचा अवमान झाला अशाप्रकारे पनौती नावाचं कॅम्पेन भाजपाने केले असा पलटवार काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला. 2018 राज्यामध्ये निवडणुका झाल्या होत्या. त्यावेळी छत्तीसगड, मध्यप्रदेश, राजस्थान या राज्यांमध्ये काँग्रेसने यापेक्षा जास्त मताने विजय मिळवला होता, पण नंतर लोकसभेच्या निवडणुका झाल्या त्यात भाजपला जास्त फायदा झाला. यावेळेस आता उलट होणार असा दावा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सोमवारी (दि. ४) माध्यमांशी बोलताना केला.

पटोले म्हणाले, सर्वांनी खूप मेहनत घेतली. ज्या काही त्रुटी राहिल्या त्या आम्ही दुरुस्त करू, काल निकाल लागल्यानंतर आम्ही तयारीला सुरुवात केलेली आहे. नव्या दमाने लोकसभेला पुढे जाऊ, लोकसभा काँग्रेसच्या नेतृत्वात निवडून आणायची आमची भूमिका आहे. दरम्यान, या तीन राज्यातील काँग्रेसच्या पराभवावर बोलत असताना ते म्हणाले की, काँग्रेस बार्गेनिंग न करणारा पक्ष आहे. आम्ही सगळ्यांना सोबत घेऊन चालणार आहोत. आम्हाला सोबत घेऊन चालण्याचे शिकवलं आणि तेच आमच्या विचारात आहे. बार्गेनिंग आणि भ्रष्टाचाराने निवडून आलेल्या लोकांची हीच मानसिकता आहे.

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी महाराष्ट्रात एकच वाघ असल्याचे विधान केले त्याबाबतीत गडचिरोलीतील जे वाघ आहे ते माणसं खात आहे, जनावर खात आहे, आता तुम्ही कोणत्या वाघाची चर्चा करत आहे मला माहित नाही असा टोला देखील पटोले यांनी लगावला. जनमताच्या कौलचा आम्ही आदर केला आहे. या ज्या काही चुका झाल्या त्याचं आम्ही आत्मपरीक्षण करू असंही पटोले म्हणाले.

पुढे ते म्हणाले की, महाराष्ट्रात डेंगूचे आजाराने कल्याण मध्ये एका बाळंतीण महिलेचा मृत्यू झाला. याची लाज सरकारला वाटत नसेल. उन्मादात विजयाचा आनंद व्यक्त करत असेल तर तो त्यांचा अधिकार आहे. आनंद व्यक्त करण्यावर आम्ही काही प्रतिक्रिया द्यायचे कारण नाही. तेलंगणा, छत्तीसगड, मध्य प्रदेश असेल या सगळ्या राज्याच्या सीमावर्ती भागात काँग्रेस विजयी झाली. बालाघाटमध्ये एक जागा भाजपला गेली.सीमावर्ती भागात जी लहर आहे तीच लहर महाराष्ट्रमध्ये सुद्धा असल्याचे पटोले म्हणाले.

ललित पाटीलला जेलमध्ये न ठेवता हॉस्पिटलमध्ये वेगळी व्यवस्था निर्माण करणे हे सरकारच्या आशिर्वादाशिवाय होऊ शकत नाही. सरकारच या व्यवस्थेत सहभागी आहे का असा प्रश्न महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात आहे. कॉंग्रेस बैठक संदर्भात छेडले असता शेतकऱ्यांचे प्रश्न, बेरोजगारी, महागाई या तीन विषयांवर आजच्या बैठकीत चर्चा होईल. विधानसभेवर सरकारला घेरण्यासाठी रणनीती ठरवायची आहे. सगळं एकमत ठरल्यानंतर आम्ही ते आपल्या समोर मांडू असे पटोले यांनी सांगितले.

Back to top button