केळीच्या पानावर जेवणे लाभदायक | पुढारी

केळीच्या पानावर जेवणे लाभदायक

नवी दिल्ली : भारतीय संस्कृतीमध्ये केळीच्या पानावर खाद्यपदार्थ ठेवून जेवण्याची पूर्वापार परंपरा आहे. श्रावणात अनेक लोक अशा पद्धतीने जेवत असतात. दक्षिण भारतात तर अनेक ठिकाणी रोजच केळीच्या पानावर जेवणारी काही लोक आहेत. केळीच्या पानावर जेवल्याने अनेक लाभही मिळतात, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

केळीच्या पानावर गरम जेवण वाढल्याने त्या पानांमध्ये असलेले पोषक द्रव्ये अन्नात मिसळतात, जे शरीरासाठी चांगले असते. केळीच्या पानांवर जेवल्याने त्वचेच्या समस्याही दूर होण्यास मदत होते. केळीच्या पानात अधिक प्रमाणात ‘एपिगालोकेटचीन गलेट’ आणि ‘इजीसीजी’सारखे पॉलिफेनॉल्स अँटिऑक्सिडंट आढळतात. केळीच्या पानावर जेवण केल्यास हे अँटिऑक्सिडंटस् आपल्या शरीराला मिळतात. ते त्वचेला दीर्घकाळ तजेलदार, टवटवीत ठेवण्यास मदत करतात.

काही अन्नपदार्थ शिजवत असताना भांड्याच्या तळाशी केळीचे पान घालण्याचीही पद्धत अनेक ठिकाणी आहे. त्यामुळे अन्नपदार्थांना एक मंद सुवास येतो. केळीच्या पानात केलेली पानगी, इडली, मोदक आणि अन्य अनेक पदार्थ स्वादिष्टही होतात. मोठा आकार, लवचिकता, तंतुमयता आणि सहज उपलब्धता यामुळे जेवायला ताटाऐवजी केळीचे पान घेण्याची परंपरा देशात अनेक ठिकाणी आढळते. जेवण झाल्यावर केळीची पाने गुरांना खायला दिल्यास त्यांचे पोटही भरते आणि कचर्‍याच्या ढिगाला आळाही बसतो.

Back to top button