बारामती : पुढारी वृत्तसेवा : नवीन भव्य-दिव्य इमारतीचे काम सुरू असल्याने बारामती एसटी बसस्थानकाचे शहरातील कसबा येथे तात्पुरते स्थलांतर झाले आहे. हे स्थलांतरीत बसस्थानक प्रवाशांच्या सोयीसाठी आहे की, गैरसोयीने हैराण होण्यासाठी असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. दोन दिवस झालेल्या अवकाळी पावसामुळे बसस्थानक आवारात चिखल व खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले आहे. ज्येष्ठ नागरिक, महिला यांना त्यामुळे मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे.
बारामती शहरात बसस्थानकाची भव्य वास्तू उभी राहात आहे. विमानतळाच्या धर्तीवर हे बसस्थानक असेल. राज्यातील सर्वाधिक आकर्षक इमारत इथे बांधली जात आहे. राज्यातच नव्हे तर देशात या पद्धतीची भव्य इमारत कुठेही बसस्थानकासाठी नाही. त्याचे काम आता अंतिम टप्प्यात आहे, परंतु त्याच्या उद्घाटनासाठी अद्याप मुहूर्त ठरलेला नाही. त्यामुळे स्थलांतरीत जागेतूनच सध्या बसस्थानक चालविले जात आहे. कसब्यातील ही जागा मोक्याची आहे, परंतु गैरसोयीचीही तितकीच आहे. इथे ना प्रवाशांसाठी निवारा ना चांगल्या स्वच्छतागृहाची सोय.
संबंधित बातम्या :
शहराच्या एका बाजूला हे बसस्थानक असल्याने तेथून शहरात यायचे झाले तरी रिक्षाचालक अडवून पैसे मागतात, ही नेहमीच ओरड होत आहे. आता अवकाळीने बसस्थानकाची पुरती वाट लागली आहे. प्रवाशांना प्रचंड मनस्ताप सोसावा लागला आहे. स्वच्छ, सुंदर बारामतीच्या नावलौकिकाला त्यामुळे बाधा येत आहे. या बसस्थानकात मोठ मोठे खड्डे पडले आहेत. पावसामुळे सर्वत्र चिखल पसरला आहे. स्थानकात बस आली की लागलीच प्रवासी जागा मिळवण्यासाठी धावतात. चिखल व खड्ड्यात घसरून पडतात, अशी स्थिती निर्माण झाली आहे. बस उभ्या करण्याचा कोणताही नियम येथे नाही. जशी जागा असेल त्याप्रमाणे चालक बस उभी करतात. त्यामुळे प्रवाशांना आपली बस कधी येईल याकरिता कायम इकडून-तिकडे करावे लागते. चिखलातून वाट काढावी लागते.
स्वच्छतागृह म्हणजे नरक यातना
पत्र्याच्या शेडमध्ये असलेले स्वच्छतागृह आतमध्ये न जावे इतपत वाईट स्थितीत आहे. पत्रे तुटलेल्या अवस्थेत आहेत. सभोवती घाणीचे साम—ाज्य आहे. त्यामुळे इथे जाण्यापुरती सुद्धा वाट राहिलेली नाही. महिलांची तर त्यामुळे प्रचंड कुचंबणा होते आहे. वाहक महिलांनाही या त्रासाला सामोरे जावे लागत आहे.