Bangladesh Win Test : बांगलादेशचा न्यूझीलंडवर ऐतिहासिक कसोटी विजय! | पुढारी

Bangladesh Win Test : बांगलादेशचा न्यूझीलंडवर ऐतिहासिक कसोटी विजय!

पुढारी ऑनलाईन डेस्क : Bangladesh Win Test : तैजुल इस्लामच्या (10 विकेट्स) घातक फिरकी गोलंदाजीच्या जोरावर बांगलादेशने सिल्हेत येथे खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटीत न्यूझीलंडचा 150 धावांनी पराभव केला. बांगलादेशने न्यूझीलंडला विजयासाठी 332 धावांचे लक्ष्य दिले होते. प्रत्युत्तरात पाहुणा किवींचा संघ केवळ 181 धावांवरच गारद झाला. या विजयासह बांगलादेशने 2 सामन्यांच्या कसोटी मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे.

तैजुल इस्लाम बांगलादेशच्या विजयाचा हिरो

चौथ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत न्यूझीलंडने 49 षटकांत 7 गडी गमावून 113 धावा केल्या होत्या. शेवटच्या दिवशी न्यूझीलंडला विजयासाठी 218 धावांची तर बांगलादेशला विजयासाठी 3 विकेट्सची गरज होती. पाचव्या दिवशी किवींनी पुढे खेळण्यास सुरुवात केली तेव्हा मैदानावर डॅरेल मिशेल आणि इश सोधी होते. या दोघांवर कसोटी वाचवण्याची जबाबदारी होती. त्यांनी संयमी फलंदाजीला सुरुवात केली. पण त्यांचा बांगलादेशच्या गोलंदाजीपुढे पुढे टीकाव लागला नाही. मिशेलचा (120 चेंडूत 58 धावा) अडसर नईम हसनने दूर करून किवींना आठवा धक्का दिला. त्यानंतर सोधीने (91 चेंडूत 22 धावा) टीम सौदीच्या (24 चेंडूत 34 धावा) साथीने डाव सांभाळला आणि धावफलक हलता ठेवला. दोघांनी 9व्या विकेटसाठी 46 धावांची सर्वोच्च भागिदारी केली. पण तैजुल इस्लामने सौदी पाठोपाठ सोधीला बाद करून बांगलादेशच्या विजयावर शिक्कामोर्तब केला.

किवींचे दिग्गज फलंदाज फेल (Bangladesh Win Test)

दुसऱ्या डावात न्यूझीलंडच्या फलंदाजांनी हाराकिरी केली. बांगलादेशाच्या फिरकी पुढे त्यांनी अक्षरश: लोटांगण घातले. टॉम लॅथम (0), डेव्हॉन कॉनवे (22), केन विल्यमसन (11), हेन्री निकोल्स (2), टॉम ब्लंडेल (6), ग्लेन फिलिप्स (12) यांच्या निराशाजन कामगिरीमुळेच त्यांना लाजिरवाण्या पराभवाला सामोरे जावे लागले.

असा झाला सामना

तत्पूर्वी, बांगलादेशने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यादरम्यान संघ 85.1 षटकांत 310 धावा केल्या. संघाकडून महमुदुल हसनने 86 धावांची खेळी केली. याशिवाय शांतो आणि मोमिनुलने 37-37 धावांचे योगदान दिले. न्यूझीलंडकडून ग्लेन फिलिप्सने 4 बळी घेतले. प्रत्युत्तरात न्यूझीलंडला 101.5 षटकात सर्वबाद 317 धावांपर्यंत मजल मारता आली. यासह त्यांनी 7 धावांची आघाडी घेतली. न्यूझीलंडकडून केन विल्यमसनने 104 धावांची खेळी केली. बांगलादेशकडून तैजुल इस्लामने 4 बळी घेतले. (Bangladesh Win Test)

दोन्ही संघांचा दुसरा डाव

बांगलादेशने दुसऱ्या डावात शानदार कामगिरी करत सर्वबाद 338 धावा केल्या. कर्णधार शांतोने संघासाठी 105 धावांची शानदार शतकी खेळी साकारली. याशिवाय मुशफिकुर रहीमने 67 तर मेहंदी हसन मिराजने 50 धावा केल्या. अशाप्रकारे किवींना विजयासाठी 332 धावांचे लक्ष्य दिले. किवींच्या एजाज पटेलने 4 बळी घेतले. प्रत्युत्तरार न्यूझीलंडचा संघ दुसऱ्या डावात पूर्णपणे फ्लॉप ठरला. त्यांचा संपूर्ण संघ 181 धावांवर ऑलआऊट झाला. बांगलादेशकडून इस्लामने 31.1 षटकात 75 धावा देत 6 बळी घेतले. एकूण सामन्यात त्याने 10 बळी पटकावण्याची किमया केली. त्याला सामनावीर पुरस्काराने गौरविण्यात आले.

बांगलादेशकडून किवींचा दुसरा पराभव

बांगलादेश आणि न्यूझीलंड यांच्यात पहिला कसोटी सामना 2001 मध्ये खेळला गेला होता. सध्या उभय संघांमध्ये 10वी कसोटी मालिका खेळली जात आहे. यातील 7 मालिका न्यूझीलंडने जिंकल्या असून दोन मालिका अनिर्णित राहिल्या आहेत. 2013-14 मध्ये दोन सामन्यांची मालिका 0-0 अशी तर, 2021-22 मधील मालिका 1-1 अशी बरोबरीत सुटली होती. बांगलादेशने कसोटी क्रिकेटमध्ये 22 वर्षात दुसऱ्यांदा न्यूझीलंडचा पराभव केला आहे. 2022 मध्ये किवी संघाला घरच्या मैदानावरच 8 विकेट्सने पराभवाला सामोरे जावे लागले होते.

Back to top button