Pune News : काका-पुतण्यात वर्चस्वाची लढाई | पुढारी

Pune News : काका-पुतण्यात वर्चस्वाची लढाई

ज्ञानेश्वर बिजले

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार असलेल्या चार मतदारसंघातून निवडणूक लढविण्याची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद असलेल्या पुणे आणि सातारा या दोन जिल्ह्यांतच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांच्याविरुद्ध अजित पवार अशी वर्चस्वासाठीची अटीतटीची लढाई रंगणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कोणाचा याबाबत निवडणूक आयोगात सुनावणी सुरू आहे, तर आमदार अपात्रतेबाबत दोन्ही गटांनी परस्परविरोधात केलेल्या याचिकांची सुनावणी विधानसभा अध्यक्षांसमोर होणार आहे. हे दोन्ही निकाल जानेवारीत लागण्याची शक्यता आहे. त्यापूर्वीच लोकसभा निवडणुकीतील लढाईचे बिगुल अजित पवार यांनी फुंकले. बारामती, शिरूर, सातारा आणि रायगड या राष्ट्रवादी काँग्रेसकडील चारही जागा लढणार असल्याचे त्यांनी शुक्रवारी जाहीर केले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे गेल्या दोन्ही निवडणुकीत प्रत्येकी चार खासदार निवडून आले. 2019 मध्ये पुणे जिल्ह्यातील बारामतीतून सुप्रिया सुळे, शिरूरमधून डॉ. अमोल कोल्हे लोकसभेवर निवडून गेले. सातारा जिल्ह्यातून पोटनिवडणुकीत श्रीनिवास पाटील खासदार झाले. हे तिघेही शरद पवार गटाकडून निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. चौथे खासदार रायगडचे सुनील तटकरे हे अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष आहेत. तेथे त्यांची लढत शिवसेनेच्या ठाकरे गटाशी होण्याची शक्यता आहे. पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील विधानसभेच्या दहा जागांपैकी राष्ट्रवादीकडे सात जागा असून, त्यापैकी सहा आमदार अजित पवार यांच्यासोबत आहेत. याव्यतिरिक्त पुणे शहरात दोन, तर पिंपरी चिंचवडमधील एक आमदार राष्ट्रवादीचे आहेत.

शरद पवार यांची गेली पाच दशके जिल्ह्याच्या ग्रामीण भागावर पकड असली, तरी गेल्या दोन दशकात त्यांच्या गटाची सूत्रे अजित पवार यांच्या ताब्यात होती. जवळपास पंधरा वर्षे ते पालकमंत्री असल्याने, त्यांचा कार्यकर्त्यांशी दांडगा संपर्क आहे. सध्या राज्यातील सत्तेत ते सहभागी झाल्याने, अजित पवार यांच्या पाठीशी आमदार व प्रमुख कार्यकर्ते मोठ्या संख्येने आहेत. राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर शरद पवार यांनी त्यांच्या गटाची फेरबांधणी सुरू केली आहे.

प्रत्येक मतदारसंघात विधानसभेचे संभाव्य उमेदवार निवडण्यास सुरवात केली आहे. त्याचवेळी लोकसभा निवडणुकीत जास्तीत जास्त खासदार निवडून आणण्याचे शरद पवार यांचे प्रयत्न असतील. अशा वेळी भाजपने पवारांना कोंडीत पकडण्यासाठी अजित पवार यांना त्यांच्यासमोर उभे केले. त्यामुळे भाजपची मते अजित पवार गटाच्या उमेदवाराला मिळतील. मात्र, त्याच वेळी शिवसेनेची मते शरद पवार गटाच्या पाठीशी उभी राहतील.

आगामी लोकसभा निवडणुकीत पुणे आणि सातारा जिल्हा कोणाच्या ताब्यात राहणार, याची जोरदार लढत होईल. पश्चिम महाराष्ट्रात गेल्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे 27 आमदार निवडून आले होते. 2014 मध्ये कोल्हापूर व माढा येथे राष्ट्रवादीचे खासदार होते. त्यामुळे, पश्चिम महाराष्ट्रात शरद पवार यांच्यासोबत काँग्रेस आणि शिवसेना (ठाकरे गट) राहिल्यास तेही जोरदार टक्कर देतील. येत्या चार महिन्यांत हा वाद दिवसेंदिवस तीव्र होत जाणार आहे.

हेही वाचा

Back to top button