कोल्हापूर : चर्चा फिसकटली; केएमटीचा संप सुरूच | पुढारी

कोल्हापूर : चर्चा फिसकटली; केएमटीचा संप सुरूच

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : महापालिका प्रशासन आणि केएमटी कर्मचारी यांच्यात संपाबाबत शुक्रवारी सायंकाळी बैठक झाली. महापालिकेने काही मागण्या मान्य करून उर्वरित मागण्याबाबत ग्वाही दिली. मात्र कर्मचार्‍यांनी ते अमान्य केले. सर्वच मागण्या मान्य कराव्यात, अशी भूमिका केएमटी कर्मचारी संघटनेने घेतली. मात्र महापालिकेने काही मागण्या राज्य शासनाच्या निर्णयाशी संबंधित असल्याने मान्य करू शकत नसल्याचे सांगितले. त्यामुळे बैठक फिसकटली. केएमटीचा बेमुदत संप सुरूच राहणार असल्याचे संघटनेने जाहीर केले.

ताराबाई पार्कातील महापालिकेच्या निवडणूक कार्यालयात बैठक झाली. प्रशासक के. मंजुलक्ष्मी, अतिरिक्त आयुक्त केशव जाधव, सहा. आयुक्त संजय सरनाईक, कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष निशिकांत सरनाईक, उपाध्यक्ष विश्वनाथ चौगुले, जितेंद्र संकपाळ, किरण सावर्डेकर, अंकुश कांबळे आदी उपस्थित होते.

तीन मागण्या मान्य…

केएमटी कर्मचार्‍यांच्या सातव्या वेतन आयोगाच्या फायलीवर प्रशासक के. मंजुलक्ष्मी यांची स्वाक्षरी झाली असून तत्काळ शासनाला सादर करत असल्याचे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले. तसेच 23 टक्के महागाई भत्ता नोव्हेंबर पेड इन डिसेंबरमध्ये दिला जाणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले. गणवेशासाठी प्रशासकीय प्रक्रिया सुरू आहे. रोजंदारांना कायम करणे, अनुकंपा तत्त्वावरील कर्मचार्‍यांना कायम करणे आणि ठोक मानधन कर्मचार्‍यांना सी बॅचमध्ये घेणे हे विषय शासन स्तरावर असल्याचे सांगण्यात आले. मात्र कर्मचारी संघटनेच्या वतीने रोजंदारासह अनुकंपा, ठोक मानधन कर्मचार्‍यांचे प्रश्न तत्काळ सोडवावेत, अशी भूमिका घेण्यात आली.

कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष सरनाईक, उपाध्यक्ष चौगुले यांनी महापालिका प्रशासनाने मागण्या मान्य केल्या नसल्याने बेमुदत संप सुरूच ठेवणार असल्याचे पत्रकारांना सांगितले. शास्त्रीनगरमधील केएमटी वर्कशॉपमध्ये सर्व कर्मचारी रात्री उशिरापर्यंत थांबून होते. संघटनेच्या पदाधिकार्‍यांनी कर्मचार्‍यांशी चर्चा केली. कर्मचार्‍यांनीही मागण्या मान्य होईपर्यंत बेमुदत संप सुरूच ठेवण्याचा निर्धार केला.

Back to top button