सावधान ! फुप्फुसाच्या कर्करोगाचे प्रमाण 16 टक्क्यांवर | पुढारी

सावधान ! फुप्फुसाच्या कर्करोगाचे प्रमाण 16 टक्क्यांवर

पुणे : पुढारी वृत्तसेवा : देशात सर्व प्रकारच्या प्रदूषणांनी आजारांचे प्रमाण वाढले असून, वायुप्रदूषणामुळे फुप्फुसाच्या कर्करोगाचे प्रमाण तब्बल 16 टक्क्यांनी वाढल्याचा अंदाज शास्त्रज्ञांनी व्यक्त केला आहे. हवा, पाणी आणि जमीनही प्रदूषित घटकांनी भरत असल्याने देशात मधुमेह, रक्तदाब, हृदयविकार अशा प्रकारच्या आजारांत मोठी वाढ झाली आहे.

दिल्ली, पुणे, मुंबई, अहमदाबाद ही चार महानगरे देशातील सर्वाधिक हवा प्रदूषित शहरे म्हणून ओळखली जातात. या शहरात वाहनांचे प्रदूषण सर्वाधिक असल्याने ‘सफर’ व केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाचे या चारही शहरावंर लक्ष आहे. मात्र, या शहरासंह तब्बल 122 शहरे ही प्रदूषणाच्या यादीत आहेत. यातील सुमारे 30 पेक्षा जास्त शहरे जगातील शंभर सर्वाधिक प्रदूषित शहरांच्या यादीत आली आहेत.

आज राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिन

2 डिसेंबर हा राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिन म्हणून साजरा केला जातो. मात्र, देशातील प्रदूषणाची पातळी कमी करण्याचे प्रयत्न खूप तोकडे पडत आहेत. इंधनावरची वाहने कमी करून अपारंपरिक उर्जेवर चालणारी वाहने तयार करण्यात येत आहेत. दुसर्‍या बाजूला पाण्याचे स्रोत खराब होत असल्याने जलप्रदूषण मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. सर्वच नद्याच्या प्रदूषणाचे नियंत्रण हे फार मोठे आव्हान सरकार समोर आहे. तसेच जमीनदेखील रसायनांच्या अनियंत्रित वापराने प्रदूषित होत आहे.

हे आजार वाढले

वायुप्रदूषणामुळे डोळ्यांची जळजळ, दमा, ब्रॉंकायटिस यांसारख्या आजारांची वाढ होत आहे. विविध प्रकारच्या वायू प्रदूषकांपैकी सस्पेंडेड पार्टिक्युलेट मॅटर म्हणजे इंधन ज्वलनातून, बांधकामाच्या धुळीमधून जे धुलिकण हवेत तयार होतात त्यांचे प्रमाण शहरांत खूप वाढले आहे. विशेषत: रेस्पायरेबल सस्पेंडेड पार्टिक्युलेट मॅटरचे सर्वाधिक आहे. हृदयविकार, श्वासोच्छवासाचे आजार यामुळे मृत्यूचे प्रमाणदेखील देशात वाढते आहे.

हेही वाचा

Back to top button